तूर खरेदीची सीबीआय चौकशी करा : चव्हाण
By admin | Published: May 23, 2017 04:18 AM2017-05-23T04:18:30+5:302017-05-23T04:18:30+5:30
राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेत केली.
ते म्हणाले की, तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना तुरीची खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले की, सरकारच्या आकडेवारीनुसार खरीप २०१५ हंगामात महाराष्ट्रात १२.३७ लाख हेक्टर जमिनीवर तूर लावली गेली आणि त्यामधून ४.४४ लाख टन तूर डाळीचे उत्पादन झाले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि शेतकऱ्यांना गेल्यावर्षी मिळालेल्या वाढीव हमी भावामुळे शेतकऱ्यांनी २०१६च्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक म्हणजेच १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र,राज्य सरकारच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका चव्हाण यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये जाहिर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील डाळींचे उत्पादन १२.५६ लाख टन होईल असे जाहिर केले. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधानसभेत ११.७१ लाख टन उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली. एप्रिलमध्ये राज्यातील तूरीचे उत्पादन २०.३५ लाख टन होईल असे केंद्र्र सरकारला कळविण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यात ११.७१ लाख टनावरुन २०.३५ लाख टन कसे वाढले, असा सवाल चव्हाण यांनी केला.