शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे

By admin | Published: September 19, 2015 04:51 AM2015-09-19T04:51:15+5:302015-09-19T04:51:15+5:30

मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार

CBI investigating Sheena Bora murder | शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे

शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे

Next

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार आणि मुंबई पोलिसांवर उलटसुलट आरोप होत असल्यानेच सीबीआयच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे.
शीना बोराच्या खुनामागे अर्थकारण असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले असल्याने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी पत्रपरिषदेत दिली. बक्षी यांनी सांगितले, की या प्रकरणासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडून गृह विभागाने अहवाल मागविला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा अहवाल आज दुपारी आपल्याकडे दिला. त्यात दयाळ यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीला मान्यता दिली. आपण केंद्रीय गृह मंत्रालय आणि सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला आहे.
शीना बोरा हत्येचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. या बदलीवरून मीडियातून टीका होताच तपास मारिया यांच्याकडेच राहील, असे बक्षी यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मारिया हा तपास करण्यास इच्छुक नसल्याच्या बातम्या आल्या. आता नेमकी काय स्थिती आहे, असे विचारले असता बक्षी म्हणाले की, मारिया यांच्याशी गृहविभागाने कुठलीही चर्चा केली नाही. तसेच, मारिया यांनीदेखील कुठलीच विचारणा तपासाबाबत केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीसच तपास करीत आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.
सीबीआयकडे तपास देणे म्हणजे मुंबई पोलिसांवर सरकारचा अविश्वास असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून ते सीबीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआय त्यास संमती देते की नाही हे लवकरच ठरेल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

सीबीआय का?
शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास जवळपास आटोपला आहे. आरोपी अटकेत आहेत. लगेच आणखी काही जणांना अटक केली जाणार नाही. असे असताना तपास सीबीआयकडे देण्यात आला, यावर मुंबई पोलिसांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आर्थिक बाबींच्या तपासासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे सरकारचे म्हणणे असले तरी हे कारण तितके पटणारे नाही. कारण आर्थिक बाबींच्या अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालय आहे, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

माध्यमांवर आरोप..
शीना बोरा हत्या प्रकरण सरकारने कधीही ‘हाय प्रोफाईल’ केलेले नव्हते;
ते मीडियाने केले, असा आरोप के.पी. बक्षी यांनी केला.

तपासात स्थानिक अधिकारी नकोत!
शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे सुुपुर्द करण्याचा निर्णय घेऊन सरकारने मुंबई पोलिसांना तपासातून बाजूला केले आहेच. शिवाय, सीबीआयच्या टीममध्येदेखील स्थानिक पोलीस अधिकारी असणार नाहीत. या केसच्या तपासात मीडियाच्या हाती काही लागू नये, यासाठी कदाचित ही खबरदारी घेतली जात असावी.

Web Title: CBI investigating Sheena Bora murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.