पेपरफुटीचा सीबीआयकडून तपास
By Admin | Published: April 25, 2017 02:31 AM2017-04-25T02:31:46+5:302017-04-25T02:31:46+5:30
ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती पेपरफुटी प्रकरणाचा समांतर तपास सीबीआयनेही सुरू केला आहे. या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आजीमाजी जवानांसह २४ आरोपींना अटक केली आहे.
राजू ओढे / ठाणे
ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती पेपरफुटी प्रकरणाचा समांतर तपास सीबीआयनेही सुरू केला आहे. या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आजीमाजी जवानांसह २४ आरोपींना अटक केली आहे.
सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (घटक क्रमांक १) फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. २५ फेब्रुवारी रोजी ठाणे पोलिसांनी नागपूर, पुणे आणि गोवा येथे धाडी टाकून सैन्यातील आजीमाजी कर्मचारी आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांच्या संचालकांसह २४ आरोपींना अटक केली. आरोपींनी फोडलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करताना आढळलेल्या ३५० विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घोटाळ्याची व्याप्ती आणि त्यामध्ये सैन्य दलातील कर्मचाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने सैन्यातर्फे यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. ठाणे पोलिसांकडून सुरू असलेला तपास त्यामुळे थांबणार नाही किंवा प्रभावितही होणार नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.