सीबीआयची राहुल मुखर्जीकडे चौकशी
By admin | Published: November 23, 2015 02:10 AM2015-11-23T02:10:46+5:302015-11-23T02:10:46+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी याच्याकडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सखोल चौकशी केली
मुंबई: बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी याच्याकडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सखोल चौकशी केली. त्याचे वडील पीटर मुखर्जीचा खुनात सहभागासंदर्भात विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीची मुदत सोमवारी संपत असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आपले वडील पीटर या प्रकरणात निर्दोष असून, तपास अधिकाऱ्यांना आपण हेच सांगितल्याचा दावा राहुल मुखर्जीने पत्रकारांशी बोलताना केला.
आतापर्यंत या प्रकरणी तिची आई इंद्राणी, संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामकुमार राय यांना अटक झालेली आहे. सध्या तिघांना ३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. शीनाच्या हत्येचा कट आणि त्यानंतरही माहिती असूनही वाच्यता न केल्याचा पीटर मुखर्जीवर आरोप आहे. त्या अनुषंगाने त्याची गेली दोन दिवस चौकशी करण्यात येत आहे. रविवारीही त्याला याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर त्याचा मुलगा व शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी यालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. शीनाबाबत पीटरचे काय मत होते? त्यांच्यातील संबंधाला त्याचा का विरोध होता? शीना बेपत्ता असल्याबाबत काय माहिती दिली, आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर राहुल मुखर्जीला पत्रकारांनी विचारल्यावर तो म्हणाला, ‘याबाबत आपण सर्व माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. पिता पीटर मुखर्जी यांचा हत्येशी संबंध असण्याची शक्यता नाही. ते निर्दोष असून, संशयितांकडून त्यांना जाणीवपूर्वक गुंतविले जात असावे, असे आपण चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जबाब दिला,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)