वैद्यनाथ बँकेवर सीबीआयचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 05:21 AM2016-12-24T05:21:30+5:302016-12-24T05:21:30+5:30
भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीडसह तब्बल
मुंबई : भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीडसह तब्बल ११ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी छापे टाकले असून, काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत. जप्त केलेल्या १० कोटी १० लाखांच्या नोटांप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पोलीस, प्राप्तिकर विभाग, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई करण्यात येत आहे. काही खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह सहकारी बँकामधील गैरव्यवहार या कारवाईतून समोर आले.
१५ डिसेंबर रोजी घाटकोपरच्या छेडानगर जंक्शन येथे वाहतूक पोलिसांनी एका कारमधून वैद्यनाथ बँकेच्या १०
कोटी १० लाखांच्या जुन्या व नवीन नोटा जप्त केल्या. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी वैद्यनाथ बँकेचे मॅनेजर तसेच इतर दोघांना ताब्यात घेऊन हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपवले होते. या प्रकरणाचा समांतर तपास सीबीआयनेही सुरू केला होता. तपासात वैद्यनाथ बँकेच्या व्यवहारात घोळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे जप्त केलेल्या नोटांप्रकरणी सीबीआयने बँकेच्या मॅनेजरसह तिघांना अटक केली.
शुक्रवारी आरोपींच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि बीड परिसरातील कार्यालये, घरे असलेल्या तब्बल ११ ठिकाणांची सीबीआयने झडती घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली. (प्रतिनिधी)
अनेकांविरोधात गुन्हे दाखल-
परळी येथे वैद्यनाथ सहकारी बँकेची मुख्य शाखा असून, तेथील २५ कोटींच्या रकमेपैकी कुर्ला येथील शाखेतून १०.१० कोटी रुपयांची रोखड पिंपरी चिंचवड येथील शाखेत नेण्यात येत होती, असे सांगण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी संशय व्यक्त करीत ही कारवाई केली.
वैद्यनाथ सहकारी अर्बन को-आॅप. बँक लि.च्या पुणे व घाटकोपर शाखांचे व्यवस्थापक, बँकेचे दोन कर्मचारी, अज्ञात बँक अधिकारी, मुंबईतील डॉक्टर, औरंगाबाद खासगी रुग्णालयातील व्यक्ती, चिंचवड-पुण्यातील एक खासगी व्यक्ती आणि अज्ञात खाजगी व्यक्तींविरोधात भादंवि १२० ब, ४२०, ४०६, ४०९, ४७७ अ आणि १३ (२), १३(१) (ड) पीसी कायदा, १९८८ या कलमांन्वये हा गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात सीबीआयचे ३० व्यापाऱ्यांवर छापे
सीबीआय पथकाने गुरुवारी पुण्यातील मार्केट यार्ड येथील 10-12 व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकल्यानंतर शुक्रवारी बिबवेवाडी, कोथरुड, लक्ष्मी रस्ता आणि लष्कर भागातील आणखी ३० व्यापाऱ्यांच्या दुकानांवर तसेच घरांवर छापे मारले.
बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेच्या लॉकर्समध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या बेहिशोबी नोटांबाबत वर्ल्ड वाईल्ड आॅईल फिल्ड मशीन्स कंपनीसह ईशान्य मोटर्सविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे.
याच गुन्ह्याच्या अनुषंगाने होत असलेल्या चौकशीमध्ये नावे समोर आलेल्या व्यापाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. सीबीआयने यासंदर्भात छापेमारी केलेल्या ठिकाणांची संख्या ४०वर पोहोचली आहे. सीबीआयच्या पथकाने या व्यापाऱ्यांकडून महत्त्वाची कागदपत्रे आणि ‘कमिशन नोट’ जप्त केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने वर्ल्ड आॅईल फिल्ड मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालय तसेच बँक लॉकर्समधून ७ कोटी ९७ लाख ९५ हजार ५०० रुपयांच्या ३९ हजार ८९३ नव्या नोटा जप्त केल्या होत्या. या तपासामध्ये नोटा बदलून देण्यासाठी ईशान्य मोटर्सच्या सत्येन गथानीचे नाव पुढे आले होते. त्याच्याकडून आणखी चार बड्या व्यापाऱ्यांची नावे समोर आली.