सीबीआय इतके हतबल आहे?
By Admin | Published: January 8, 2016 02:38 AM2016-01-08T02:38:53+5:302016-01-08T02:38:53+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच बंदूक वापरण्यात आल्याचा दाट
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच बंदूक वापरण्यात आल्याचा दाट संशय असूनही सीबीआयला यासंदर्भातील बॅलिस्टिक अहवाल कर्नाटक पोलिसांकडून मिळवण्यात अपयश आले आहे. मात्र याबाबत उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
देशाची केंद्रीय तपास यंत्रणा एवढी हतबल आहे का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्याचे पोलीस महासंचालक व सीबीआयचे संचालक यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक व सीआयडी महासंचालकांच्या निदर्शनास ही बाब आणण्याचे निर्देश दिले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने तर पानसरेंच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) घटनास्थळावर सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या कर्नाटक पोलिसांना कलबुर्गींच्या हत्येच्या तपासात सहकार्य करण्यासाठी गेल्याच वर्षी पाठवल्या, अशी माहिती दोन्ही तपास यंत्रणेच्या वकिलांनी यांच्या खंडपीठाला दिली. दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांतर्फे अॅड. अभय नेवगी यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या तिन्ही हत्यांसाठी एकाच बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘बंगळुरू न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार, तिन्ही घटनास्थळांवरून जप्त करण्यात आलेल्या पुंगळ्या एकाच बंदुकीतून निघालेल्या आहेत, असे एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे,’ असे अॅड. नेवगी यांनी सांगितले.
याबाबत विचारणा केली असता दोन्ही तपास यंत्रणांनी यात कितपत तथ्य आहे, हे आम्हाला माहीत नाही, असे खंडपीठाला सांगितले. ‘दोन्ही तपास यंत्रणांनी कर्नाटक सीआयडी महासंचालकांना पत्र लिहून अहवाल देण्याची विनंती केली. मात्र त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. तसेच कर्नाटकच्या एफएसएलनेही अहवाल देण्यास नकार दिला,’ असे सीबीआयचे वकील अनिल सिंग तर एसआयटीचे वकील संदीप शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले.
‘केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या तपास यंत्रणेला अहवाल कसा मिळाला नाही? सीबीआय अशा प्रकारच्या तक्रारी करत आहे, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तसेच सीबीआयसारख्या तपास यंत्रणेला कर्नाटक पोलीस सहकार्य करीत नाहीत, याचेही आश्चर्य वाटते. कर्नाटक पोलिसांच्या असहकार्यामुळे तपास खोळंबला आहे,’ असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)