सीबीआय पथक मेळघाटात
By admin | Published: February 28, 2015 05:03 AM2015-02-28T05:03:02+5:302015-02-28T05:03:02+5:30
दोन वाघांच्या शिकार प्रकरणाचा तपास राज्य शासनाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला होता़ त्यानुसार सीबीआयचे पथक मेळघाटात
गणेश वासनिक, अमरावती
दोन वाघांच्या शिकार प्रकरणाचा तपास राज्य शासनाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला होता़ त्यानुसार सीबीआयचे पथक मेळघाटात दाखल झाले असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घटांग, ढाकना परिसरात दीड वर्षापूर्वी अस्वलाची शिकार करण्याच्या उद्देशाने लोखंडी जाळी (ट्रॅप) शिकाऱ्यांनी लावली होती. मात्र, या जाळ्यात अस्वलासोबत वाघ अडकले होते. कालांतराने मेळघाटात दोन वाघांची हत्या केल्याची कबुली नागपूर विमानतळावर पकडलेल्या दोघांनी दिली होती. प्रारंभी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर यातील आरोपींची संख्या आठवर पोहोचली होती. वाघांची हत्या प्रकरणात नागपूर, रामटेकसह मध्य प्रदेशातील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण वन विभागाकडे सोपविल्यानंतर नागपूर वन विभागाचे अधिकारी मेळघाटात त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोहोचले होते. घटांग, ढाकना वनपरिक्षेत्रात दोन वाघांची शिकार झाल्याप्रकरणी वनपालांना कारणे दाखवा तर एका वनरक्षकाचे निलंबन केले होते. मात्र, या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.