स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम, कुठलीही फी वाढ केली जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 06:30 IST2025-03-21T06:29:16+5:302025-03-21T06:30:39+5:30
आपल्याला ३० टक्क्यांपर्यतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे. मराठी भाषेला यात प्राधान्य असेल...

स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम, कुठलीही फी वाढ केली जाणार नाही
मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील केवळ इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. पुढच्या वर्षी दोन टप्प्यांत दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान भवनात पत्रकारांना दिली.
कुठलीही फी वाढ केली जाणार नाही
सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही पुढे जाणार आहोत.
वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षित करणार
सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला तर त्यांना शिकविणारे शिक्षक यांनाही प्रशिक्षित करावे लागेल. वर्षभर त्याची तयारी करणार आहोत. वर्षभरात शिक्षक, अधिकारी यांना सीबीएसई पॅटर्नसाठी प्रशिक्षित करून पुढील वर्षी दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मराठीमधूनच पुस्तके उपलब्ध असतील
आपल्याला ३० टक्क्यांपर्यतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे. मराठी भाषेला यात प्राधान्य असेल. त्याप्रमाणेच अभ्यासक्रम केला जाईल. मराठीमधूनच पुस्तके उपलब्ध असतील. दुसऱ्या माध्यमाच्या शाळेतही मराठी ज्या पद्धतीने बंधनकारक आहे. तो शिकविण्यास लागणाऱ्या स्टाफकडे मराठी शिक्षणाची डिग्री असली पाहिजे अशी नियमावली असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.