सीबीएसई बारावीचा निकाल २८ दिवसांत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:55 AM2019-05-03T02:55:45+5:302019-05-03T02:56:11+5:30

विद्यार्थी, पालकांना सुखद धक्का; अनेक शाळांचा निकाल १०० %

CBSE HSC results declared in 28 days | सीबीएसई बारावीचा निकाल २८ दिवसांत जाहीर

सीबीएसई बारावीचा निकाल २८ दिवसांत जाहीर

googlenewsNext

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीचा परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. परीक्षा पार पडल्यानंतर अवघ्या २८ दिवसात निकाल जाहीर करून मंडळाने विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का दिला आहे. सीबीएसईने १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. पुण्यातील सीबीएसईच्या अनेक शाळांचे बारावीचे निकाल १०० टक्के लागले आहेत. नव्वदपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

दिल्ली पब्लिक स्कूलच्या १४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शुभा मुखर्जी हिने ९७.८ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकाविला. मेधा अरोरा हिस ९७.४ टक्के मिळाले. संस्कृती शाळेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचा विद्यार्थी आदित्य देशपांडे याने विज्ञान शाखेमध्ये ९७.२ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेयस सहारे या विद्यार्थ्याने ९६.४ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकाविला आहे. सुमेधा पंजा हिला ९६.२ टक्के गुण मिळाले. जी. जी. इंटरनॅशनल स्कूलच्या ११९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दृष्टी पेशवानी हिने विज्ञान शाखेत ९६.८ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेमध्ये श्रृष्टी शर्मा हिने ९५ टक्के गुण मिळविले. डीएव्ही स्कूलची स्रेहा गोंडूकुपी ही विद्यार्थिनी ९७.६ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. आर्चिता देसाई हिस ९६.८ टक्के गुण मिळाले.केशवनगर येथील ऑर्बिस स्कूलच्या हिंमाशू कोद्रे याने ९५.२ टक्के तर संजय श्रीवास्तव याने ९४.२ टक्के गुण मिळवले.

मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा नऊने जास्त

  • देशभरातील २ लाख ५ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील १० लाख ५ हजार ४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी प्रमाणेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.
  • उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर राष्टÑीय पातळीवरील निकालात पहिले सातही क्रमांक विद्यार्थिनींनी पटकाविले आहेत.
  • ९४ हजार विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण सीबीएसई बारावीच्या १७ हजार ६९३ विद्याार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्याार्थ्यांची संख्या ९४ हजार २९९ आहे.

 

शिक्षक आणि पालकांमुळेच मला हे यश मिळाले. माझ्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे हे फळ आहे. योग्य दिशेने मेहनत आणि अभ्यासाचा योग्य मार्ग यामुळे मी ९७.४ टक्के इतके गुण मिळवू शकले आहे. यापुढे मी फायनान्स विषयासाठी प्रवेश घेणार आहे. त्यादृष्टीने नियोजनबद्ध अभ्यासही मी करणार आहे. - तानिया अगरवाल, आर.एन. पोदार सीबीएसई स्कूल, सांताक्रुझ (वाणिज्य शाखा)

मी वर्षभर जी मेहनत केली त्याचे फळ मला गुणांच्या रूपात मिळाले. पुढे मला सीए फाउंडेशन कोर्सची परीक्षा द्यायची आहे. सध्या त्यावरच माझे लक्ष केंद्रित आहे. सोबतच बीकॉम करण्याचाही माझा विचार आहे. - उर्वाना दिवाण, आर.एन. पोदार सीबीएसई स्कूल, सांताक्रुझ (वाणिज्य शाखा)

मला ९६.२ टक्के मिळाले असून, भविष्यात मला देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावायचा आहे. बोर्डाच्या परीक्षा हा सगळ्यांसाठीच कठीण टप्पा असतो, तसा तो माझ्यासाठीही होता. मात्र, संयम आणि योग्य व्यवस्थापन यामुळे मी तो यशस्वीरित्या पार करू शकले. तसेच माझे शिक्षक, मित्र आणि पालकांनी वेळोवेळी माझे मनोबल उंचावण्यात मला मदत केली. त्यामुळेच मी इतक्या चांगल्या गुणांचा टप्पा पार करू शकले. - चाहत जैन, रायन इंटरनॅशनल स्कुल, कांदिवली (वाणिज्य शाखा)

मला ९५.८ टक्के मिळतील असा विचारच मी कधीच केला नव्हता. माझे पालक आणि शिक्षकांनी माझ्यावर घेतलेली मेहनत फळाला आली आहे. भविष्यात इकॉनॉमिक्स आणि गणित विषय घेऊन करिअर करण्याचा माझा विचार आहे. यासाठी शाळेतील शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतच आहे. - संप्रिती दास, डीएव्ही इंटरनॅशनल स्कुल, खारघर (वाणिज्य शाखा)

Web Title: CBSE HSC results declared in 28 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.