सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:05 AM2019-05-07T07:05:12+5:302019-05-07T07:05:34+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

 CBSE Results: Toppers of Mumbai, Thane, Navi Mumbai | सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

googlenewsNext

मुंबई/ ठाणे/नवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी देशाच्या गुणवत्ता यादीत (टॉपर) झळकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडा, धात्री मेहता आणि ठाण्यातील अ‍ॅड्री दास या तिघांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. तर नवी मुंबईतील वंशिका लोहाना हिला ४९६ गुण मिळाले. नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.

ठाण्याच्या न्यू होरायझन्स स्कूलचा अ‍ॅड्री दास हा शहरात प्रथम आला आहे. त्याने ९९.४ टक्के इतके गुण पटकावले आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्रात आपले करिअर करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. लहानपणापासूनच अ‍ॅड्रीला अभ्यासामध्ये रुची होती आणि शाळेत पहिल्यापासून तो अव्वल असे. दहावीत त्याने फक्त गणित या विषयासाठी खासगी शिकवणी लावली होती. इतर विषयांचा अभ्यास तो घरच्या घरीच करत होता. दिवसातून सहा ते सात तास तो अभ्यास करीत असे. तो त्याची आई अनिमिता यांच्या सोबत घोडबंदर रोड येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील कामानिमित्त परदेशात असतात. हिंदी या विषयात त्याला ९७ गुण मिळाले असून इतर विषयांत त्याला १०० गुण मिळाले आहेत. दुपारी २.३० वाजता त्याला निकाल कळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंब, मित्रांना समजल्यावर त्यांनी घरी तर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे अ‍ॅड्रीने सांगितले. वडिलांना आम्ही स्वत: परदेशात भेटायला जाऊन त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करणार असल्याचे तो म्हणाला.

नवी मुंबई व पनवेलमधील पाच जणांना ९९ टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासाचा अधिक ताण न घेता इतर छंद जोपासत केवळ नियमित अभ्यास करून हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीएसई बोर्डातही दहावीच्या निकालात नवी मुंबईत मुलींनी बाजी मारली आहे. नेरूळच्या एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा व कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलची धात्री मेहता या दोन्ही विद्यार्थिनींनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले. तर याच शाळेतील ऋजुता कुलकर्णी हिने ४९५ गुण मिळवले. न्यू हॉरीझन पब्लिक स्कूलमधील वंशिका रूपचंद लोहाना हिला ४९६ व खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रांजल गोयलला ४९५ गुण मिळाले आहेत. धात्री मेहता हिने विज्ञान, गणित, संस्कृत व सोशल सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. दीपस्ना हिनेही विज्ञान, गणित व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईतील अणुशक्तीनगरमधील अ‍ॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल शाळेतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि मुलुंडच्या व्हीपीएमएस बीआर तोल इंग्रजी शाळेतील प्रणिता राव या तिन्ही विद्यार्थ्यांना ४९५ गुण मिळाले आहेत.

Web Title:  CBSE Results: Toppers of Mumbai, Thane, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.