‘सीसीआय’चा कापूस खरेदीला खो!
By admin | Published: November 20, 2015 02:09 AM2015-11-20T02:09:12+5:302015-11-20T02:09:12+5:30
दिवाळीही गेली; शेतक-यांना खरेदीची प्रतीक्षा.
राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यात कापूस खरेदीला अद्याप म्हणावा तसा वेग आला नसून, खासगी बाजारात आतापर्यंत जवळपास १४ लाख क्विंटल कापूस शेतकर्यांनी विकला आहे. पणन महासंघाकडेही कापसाची आवक संथ गतीने असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकर्यांचे लक्ष भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीकडे लागले आहे; परंतु सीसीआयने कापूस खरेदीला खो दिल्याने त्याचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. यावर्षी कापसाला प्रतिक्विंटल ४१00 रुपये भाव जाहीर झाला आहे. पणन महासंघाकडून हमीदरानुसार कापसाची खरेदी केली जात आहे. मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास महांसघाचा (नाफेड) उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केली; परंतु गतवर्षी केंद्र सरकारने नाफेडशी करार न केल्याने सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघ राज्यात कापूस खरेदी करीत आहे. गतवर्षी सीसीआयने देशात ३३५ व महाराष्ट्रात ७0 च्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करून, ८६.९0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. पणन महासंघाने ११५ खरेदी केंद्र सुरू केली होती. यावर्षी पणन महासंघाने २0 पेक्षा जास्त कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सीसीआय दिवाळीनंतर खरेदी सुरू करणार होते; परंतु सीसीआय देशभरातील त्यांच्या १४ प्रादेशिक कार्यालयांकडून कापूस उपलब्धतेची माहितीच गोळा करीत आहे. १४ पैकी ३ प्रादेशिक कार्यालयांनी खरेदी सुरू करण्यासाठीची अनुमती मागितली; तथापि महाराष्ट्रात अद्याप या विषयावर माहिती गोळा करणेच सुरू असल्याने कापूस खरेदीला सीसीआयकडून विलंब होत आहे. कापसाचे हमीदर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून कापूस खरेदी केल्या जात असल्याने शेतकर्यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. सीसीआय थेट कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावीत, या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, प्रक्रियेसाठी लागणारा कापूस व उपलब्धता, यासाठी सीसीआयच्या देशातील १४ प्रादेशिक कार्यालयाकडून माहिती गोळा केली जात असून काही प्रादेशिक कार्यालयांनी कापूस खरेदीसंदर्भात माहिती पोहोचवली आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू होतील, असे सीसीआयचे महादेव कुंभार यांनी स्पष्ट केले.