‘सीसीआय’चा कापूस खरेदी करारास विलंब!

By admin | Published: October 30, 2015 01:48 AM2015-10-30T01:48:50+5:302015-10-30T01:48:50+5:30

पणन महासंघ तयार, सीसीआयसोबत कराराची प्रतीक्षा.

CCI delayed the purchase of cotton! | ‘सीसीआय’चा कापूस खरेदी करारास विलंब!

‘सीसीआय’चा कापूस खरेदी करारास विलंब!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यात खरिपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक यावर्षी सुरू झाली असल्याने महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने हमीदराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे; परंतु भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदीसंदर्भात करार केला नसल्याने शेतकर्‍यांना खासगी बाजारात कापसाची विक्री करावी लागत आहे. कापूस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने पणन महासंघाला यावर्षी दीडशे कोटी रुपये संरक्षित ठेव रक्कम (माजिर्न मनी) दिली असल्याने, पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. या अगोदर कापूस उत्पादक पणन महासंघाने राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास (नाफेड) महासंघाचा अभिकर्ता म्हणून २0१३-१४ पर्यंत कापसाची खरेदी केली; परंतु मागील वर्षी केंद्र शासनाने कापूस खरेदीसाठी नाफेडशी करार केला नसल्याने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कापूस महामंडळाने २0१४-१५ मध्ये कापसाची खरेदी केली. त्यामुळे सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाला मागील वर्षी कापसाची खरेदी करावी लागली. पणन महासंघाने गतवर्षी ११५ कापूस खरेदी केंद्रांमार्फत राज्यात हमीदराने कापूस खरेदी केली आहे. दरम्यान, मागील वर्षी ४१५0 रुपये हमीदर होते; तथापि या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात यापेक्षा जास्त दर असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ कापूस दरासंदर्भातील शेतकर्‍यांचे कवच असल्याने यावर्षी पणन महासंघाचे केंद्र उघडणार कधी, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सीसीआयचा अद्याप पणन महासंघासोबत करार झाला नसला, तरी राज्य शासनाने परवानगी दिल्यास येत्या १५ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी केंद्र सुरू करणार आहे. कापूूस खरेदीसंदर्भात सीसीआयचा अद्याप पणन महासंघासोबत करार झाला नसून, या कराराची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. कापूस खरेदी करण्यासाठी यावर्षी पणन महासंघाने पूर्ण तयारी केली आहे. हमीदराने कापूस खरेदी करण्यात येणार आहे. सुरुवातीला राज्यात २0 ते २५ खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. गरजेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी यांनी स्पष्ट केले.

Web Title: CCI delayed the purchase of cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.