सीसीआय सुरू करणार ६४ कापूस खरेदी केंद्रे; ९० लाख गाठी उत्पादनाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:41 AM2017-10-11T04:41:29+5:302017-10-11T04:42:46+5:30
राज्यात यंदा कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून, शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अजय पाटील
जळगाव : राज्यात यंदा कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून, शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया)कडून राज्यात यंदा ६४ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या ६४ पैकी ३५ केंद्र औरंगाबाद विभागात, तर २९ केंद्र अकोला विभागात सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी सीसीआयकडून ५८ केंद्रावर खरेदी करण्यात आली होती.
गेल्या वर्षी राज्यात ३९ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा ४२ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होणार आहे.