जेजुरीगडावर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Published: January 17, 2017 01:55 AM2017-01-17T01:55:55+5:302017-01-17T01:55:55+5:30
सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या फुटेजच्या आधारे मागील आठवड्यात काही पाकीटमार व मोबाईलचोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात यश आले
जेजुरी : खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे भाविकांच्या गर्दीच्या वेळी अनुचित प्रकारांवर आळा बसत असल्याचे निदर्शनास येत असून, सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या फुटेजच्या आधारे मागील आठवड्यात काही पाकीटमार व मोबाईलचोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
रविवारी (दि. १५) मंदिर व गडकोट आवारामध्ये काही अल्पवयीन मुलांच्या संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले.
सध्या लग्नसराईचे दिवस व सहलींचा मौसम असल्याने खंडोबा मंदिरामध्ये देवदर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे. विशेषत: रविवार हा शासकीय सुटीचा व खंडोबाच्या देवदर्शनाचा वार असल्याने मोठ्या संख्येने भाविक गडावर येतात. या गर्दीचा फायदा घेत काही पाकीटमार व मोबाईलचोर हात साफ करून घेतात.
मागील काही वर्षी पाकीटमार, दागिनेचोरी व मोबाईल गहाळ झाल्याच्या घटना पोलीस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. भाविकांच्या वाढत्या तक्रारी पाहता देवसंस्थान विश्वस्त समितीने गडकोट आवार व मंदिर परिसरात ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणा गतिमान केल्यामुळे पाकीटमार अथवा मोबाईलचोरी करणाऱ्या महिला अथवा अल्पवयीन मुले चित्रणात कैद होत आहेत.
तसेच अनुचित प्रकार करणाऱ्या अशा व्यक्तींना प्रतिबंध करणे अथवा पोलिसांच्या ताब्यात देणे सुरक्षारक्षकांना सोपे झाले आहे.
सध्या ५४ कॅमेरे कार्यान्वित असून पुढील काही दिवसांमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देवसंस्थानच्या भक्तनिवास, गडकोट पायरीमार्ग व शहराच्या प्रमुख चार चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे तसेच सुमारे १२ ते १५ कॅमेरे बसविणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले.
(वार्ताहर)
।दोन मुलांचे पलायन
दोन दिवसांपूर्वी रविवारी गर्दीचा फायदा घेत काही अल्पवयीन अनोळखी मुले संशयास्पद हालचाली करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
हे चित्रण पाहून मंदिरातील सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले, तर दोन मुलांनी पलायन केले. भविष्यात भाविकांच्या सुरक्षिततेवर व सोई-सुविधांवर देवसंस्थान भर देणार असल्याचे घोणे यांनी माहिती देताना सांगितले.