सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर, दोन दिवसांत अध्यादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:09 AM2017-09-24T00:09:18+5:302017-09-24T00:09:39+5:30
सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
औरंगाबाद : सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जालना येथे नितीन कटारिया आणि गोविंद गगराणी यांच्या नुकत्याच झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूर्वी जिल्हा नियोजन विकास समितीकडून साडेतीन ते दहा टक्के निधी उपलब्ध होई. आता मात्र आम्ही सीसीटीव्हीच्या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष (हेड) तयार केले आहे, याबाबतचा अध्यादेश दोन दिवसांत निघेल.
मुंबई, पुण्याप्रमाणेच औरंगाबादसारख्या शहरातील महिला मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले. काम करणाºया महिलांसाठी पुणे पोलिसांनी एक मॉडेल तयार केले. त्या मॉडेलचा वापर अन्य शहरांत करता येतो का, याची चाचपणी केली जात आहे. या मॉडेलनुसार आय.टी. सेक्टरमध्ये काम करणाºया १० ते २० महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एका पोलीस हवालदारावर सोपविली जाते. तो त्यांचा सुरक्षारक्षक म्हणूनच कायम त्यांच्या संपर्कात असतो. यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना येते. शिवाय महिला आयपीएस अधिकारी आणि आमदार महिलांची कमिटी स्थापन केली. कमिटीकडूनही आम्ही महिलांसंबंधी गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न केले. यासोबतच सोशल इंजिनीअरिंगचे कामही पोलिसांना करावे लागत आहे.
भाजपा राणेंना जवळ करणार नाही
नारायण राणे ही अपप्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला महाराष्ट्रातील जनतेने कायम दूर ठेवले आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा नारा आहे, असे असताना आमचा मित्रपक्ष भाजपा राणेंना पक्षात घेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणार नाही, अशी कोपरखळी केसरकर यांनी मारली.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात यायचे असून, त्याला भारतात आणण्यास भाजपाने सेटलमेंट केल्याचा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आरोप केला होता, याबाबत ते म्हणाले की, राज हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र गुन्हेगाराबद्दलची सर्वाधिक माहिती ही पोलिसांकडेच असते.