कोकण रेल्वेवरील स्थानकांवर सीसीटीव्ही
By Admin | Published: January 15, 2015 05:18 AM2015-01-15T05:18:17+5:302015-01-15T05:18:17+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जात असतानाच आता कोकण रेल्वेमार्गावरील गर्दीच्या स्थानकांवरही सीसीटीव्ही
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जात असतानाच आता कोकण रेल्वेमार्गावरील गर्दीच्या स्थानकांवरही सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. कणकवली स्थानकात नुकतेच सीसीटीव्ही बसविले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रभू यांनी तीन दिवसांपूर्वीच ही घोषणा केली.
कणकवली स्थानकात एकूण नऊ सीसीटीव्ही बसविले आहेत. याप्रसंगी बोलताना प्रभू म्हणाले, की प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेमार्गावरील सध्या दोन स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले आहेत. आणखी गर्दीच्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. यावर रेल्वेतील सूत्रांनी सांगितले, की सुरुवातीला नऊ गर्दीची स्थानके रेल्वेकडून निवडण्यात आली असून, त्यावर सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे की नाही याची चाचपणी केली जात आहे. त्यानुसारच अंतिम स्थानकांची निवड सीसीटीव्ही बसविण्यासाठी केली जाईल, असे सांगण्यात आले.
स्थानकांवर टुरिस्ट गाइड
पर्यटकांना कोकणची माहिती मिळावी, यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर टुरिस्ट गाइड नेमण्याचा निर्णय झाला आहे. स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाच परिसराची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनाच टुरिस्ट गाइडचे काम देण्यात आले असल्याचे यावेळी प्रभू यांनी सांगितले. १० टुरिस्ट गाइड कणकवली स्थानकात, तर गोवा विभागात ७३ गाइडची नेमणूक केली आहे. या गाइडना कोकण रेल्वेकडून एक बॅचही दिला जाणार असल्याचे सागितले. (प्रतिनिधी)