कचराकुंडीवर सीसीटीव्हीचा वॉच
By admin | Published: June 28, 2016 12:59 AM2016-06-28T00:59:47+5:302016-06-28T00:59:47+5:30
प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक वसंत मोरे यांनी नागरिकांनी कचराकुंडीत कचरा टाकावा व याची शिस्त नागरिकांना लागावी
बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक वसंत मोरे यांनी नागरिकांनी कचराकुंडीत कचरा टाकावा व याची शिस्त नागरिकांना लागावी, यासाठी सीसीटीव्ही बसवला असून, प्रत्येक कचरा टाकणाऱ्यावर नजर ठेवण्यात येत आहे.
पुणे शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. मात्र स्मार्ट सिटी करण्यासाठी स्मार्ट आयडियाच आपले शहर स्मार्ट बनवू शकतील, हे वसंत मोरे यांनी त्यांनी केलेल्या उपक्रमातून सिद्ध करून दाखवले आहे. कात्रज गावाच्या मुख्य चौकात मागील अनेक वर्षांपासून कचराकुंडी आहे. याच ठिकाणी तलाठी कार्यालय, कात्रज भागातील भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच मोरे यांचे निवासस्थान व संपर्क कार्यालयदेखील आहे. त्यामुळे या भागात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते.
या कचराकुंडीत पूर्वी सुमारे २५ कुत्रे लोळत पडलेले असायचे. कचराही बाहेर टाकला जायचा. त्यामुळे या चौकात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले होते.
यावर उपाय म्हणून वसंत मोरे यांनी या चौकात सीसीटीव्ही बसवले. या सीसीटीव्हीचा एक कॅमेरा या कचराकुंडीकडे तोंड करून बसवला. त्यामुळे या कुंडीत कोण कचरा टाकतो, कोण बाहेर टाकतो, हे सर्व मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील टीव्हीमध्ये दिसू लागले. या कचराकुंडीशेजारी एक माईक बसवण्यात आला आहे. जो कोणी कचराकुंडीच्या बाहेर कचरा टाकेल त्याचक्षणी माईकवरून सांगण्यात येते, की कचराकुंडीत कचरा टाका. आजूबाजूला असलेले कार्यकर्ते तसेच नागरिकांचे लक्ष तिकडे केंद्रित होते. अनेक जणांना या ठिकाणी बाहेर टाकलेला कचरा कचराकुंडीत हाताने टाकावा लागला. त्यामुळे मागील एक महिन्यापासून प्रत्येक व्यक्ती बरोबर कचराकुंडीतच कचरा टाकतो. कचराकुंडी भरली की क्षेत्रीय कार्यालयामार्फत तातडीने कचराही नेला जातो. त्यामुळे या ठिकाणची घाणदेखील कमी झाली आहे, तसेच नागरिकांना आता कचराकुंडीतच कचरा टाकला पाहिजे ही सवयदेखील लागली आहे. त्यामुळे भाजपने आणलेल्या स्मार्ट सिटीचे स्वप्न मनसेच्या मोरे यांनी आपल्या प्रभागातून स्मार्टपणे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)
>सर्वसामान्य नागरिक काही वेळा कचराकुंडीच्या बाहेरच
टाकताना दिसतात. त्यांना असे वाटते की आपल्याला कोणी पाहत नाही.
नगरसेवकांचीच कचराकुंडी परिसरावर सीसीटीव्हीद्वारे नजर असते. कचरा बाहेर पडताच नगरसेवक त्यांच्या कार्यालयातून लाउडस्पीकरवरून सूचना देतात.