राज्यभरात दोन महिन्यांत सीसीटीव्ही
By admin | Published: April 6, 2016 04:57 AM2016-04-06T04:57:36+5:302016-04-06T04:57:36+5:30
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्ह्यांचा तपास करण्यास मोलाची मदत व्हावी, याकरिता येत्या दोन महिन्यांत राज्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील
मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्ह्यांचा तपास करण्यास मोलाची मदत व्हावी, याकरिता येत्या दोन महिन्यांत राज्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील लक्षवेधी मांडली होती. यावर रणजित पाटील बोलत होते. ते म्हणाले, पुण्यातील महत्त्वाच्या दहा ठिकाणी ३५० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुण्यात रेल्वे स्थानक, बस स्थानक, सिनेमा हॉल, सार्वजनिक बागा, शैक्षणिक संस्था, प्रमुख धार्मिक स्थळे; या संबंधित ठिकाणी पोलीस ठाण्याकडून साध्या वेशातील महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये हेल्पलाईनचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस बिट मार्शल नेमण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, आयटी कंपन्यांत महिला सुरक्षाविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)