CDS Bipin Rawat Death: "बिपीन रावत यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते", संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:40 PM2021-12-08T20:40:35+5:302021-12-08T20:41:43+5:30
CDS Bipin Rawat Death : बिपीन रावत यांच्या निधनानंतर त्यांना खासदार संभाजीराजे यांनी फेसबुकद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई : भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांचे तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघात बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत आणि इतर 13 जणांचा मृत्यू झाला. भारताच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पेलणाऱ्या बिपीन रावत यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिपीन रावत यांच्या निधनानंतर त्यांना खासदार संभाजीराजे यांनी फेसबुकद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. तसेच, 2017 साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, असेही संभाजीराजे म्हणाले.
याचबरोबर, कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता. जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे.... संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले...जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अकरा मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.