गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

By admin | Published: July 10, 2017 02:35 AM2017-07-10T02:35:16+5:302017-07-10T02:35:16+5:30

रविवारी शहरात सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले.

Celebrate in gurupornima excitement | गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रविवारी शहरात सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले. शहरातील अनेक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भजन, कीर्तन आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थांच्या मठांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने दादर येथील स्वामींच्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, त्यांच्या गुरूंची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या, तर ज्यांना रविवारी गुरूंना भेटता आले नाही, अशा लोकांनी त्यांच्या गुरूंना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली.
रविवारी श्री स्वामी समर्थांच्या मठांसह शहरातील श्रीदत्तगुरूंच्या मंदिरांमध्येही दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर, विलेपार्ले येथील श्रीदेवदत्त प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला.
विक्रोळी येथील सद्गुरू दाभोळकर स्वामींनी त्यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. प्रत्येक जण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना एखादी भेट, पुष्पगुच्छ किंवा एक फूल तरी देत असतो. त्यामुळे शुक्रवारपासूनच दादरच्या फूल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली होती. त्यामध्ये गुलाबाची मागणी सर्वात जास्त असल्याने, झेंडूच्या फुलांनी भरलेल्या दादरच्या फूल बाजारामध्ये सर्वत्र गुलाबाची फुले पाहण्यास मिळाली.
सोशल मीडियावर गुरूप्रेमाचे भरते
रविवारी अनेकांनी त्यांच्या गुरूंना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, परंतु अनेकांना रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे किंवा कामामुळे त्यांच्या गुरूंना भेटता आले नाही. अशा लोकांनी सोशल मीडियाच्या मदतीने गुरूंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडून आशीर्वादही घेतले.
फेसबुक टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळत होते. सोशल मीडियावर गुरू देवदत्त, स्वामी समर्थ, गुरू द्रोणाचार्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई, शिवरायांचे गुरू समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांच्या कथा व फोटो फिरत होते.
>गुरुपौर्णिमा नव्हे ‘गुगल पौर्णिमा’!
>मुंबई : सध्याच्या तंत्रज्ञान युगात ‘गुगल’ला तरुणाई आपला गुरू मानत आहे. गुगलमुळे कोणत्याही प्रकारची माहिती एका क्लिकवर सगळ््यांना उपलब्ध होते, तर अशा ‘गुगल’ गुरूंना गुरुवंदनेसाठी अनोख्या गुगल पौर्णिमेचे आयोजन केले होते.
एका क्लासच्या विद्यार्थ्यांनी कांदिवली येथील समता हॉलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी सॉफ्टवेअरतज्ज्ञ प्रसाद शिरगावकर म्हणाले, मिळालेल्या माहितीचा वापर करून त्याचे कौशल्यात रूपांतर होते. त्यातून प्राप्त होणाऱ्या अनुभवाचा विचार केला जातो, त्या अनुभवातून ज्ञान प्राप्ती होते. तर वेब पत्रकार प्रशांत जाधव म्हणाले की, मुली तंत्रज्ञानाला काही वेळा घाबरतात. मात्र, त्यांनी तंत्रज्ञानातील सर्व गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. तर सायबर गुन्हांचे तज्ज्ञ निखिल महाडेश्वर म्हणाले, गुगलवर मोफत अ‍ॅप्लिकेशन, गेम्स डाउनलोड करतो, पण हे मोफत नसते. डाउनलोड करताना आपण ‘आय एक्सेप्ट’ बटणावर क्लिक करतो. त्याद्वारे आपले कॉन्टॅक्ट्स, मेसेज, कॉल हिस्ट्री, लोकेशन, वाय-फाय, कॅमेरा या गोष्टी आपण खुल्या करत असतो. तंत्रज्ञानाचा आपण योग्यरीत्या वापर न केल्यास, त्यातून सायबर गुन्हे घडण्याचाही धोका असतो. कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर सोन्नर यांनी विद्यार्थ्यांना अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून गुगलचे फायदे, तोटे समजावून सांगितले. प्रशांत पेडणेकर यांनी ‘गुगल पौर्णिमे’ची संकल्पना मांडली, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला
मानवसेवा हीच गुरुसेवा
मुंबई : मानवसेवा हीच खरी परमेश्वराकडे रुजू होणारी गुरुसेवा आहे, असे प्रतिपादन आमदार सुनील प्रभू यांनी गोरेगाव (पूर्व) आरे रोडवरील दत्त मंदिर येथे केले. श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे पौर्णिमेनिमित्त गरजू, ज्येष्ठ नागरिक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना छत्रीवाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप आणि अपंगांना व्हीलचेअर वाटप आयोजित कार्यक्रमात सुनील प्रभू बोलत होते. या वेळी नगरसेविका साधना माने, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर देसाई, विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर उपस्थित होते.

Web Title: Celebrate in gurupornima excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.