मराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 04:46 PM2018-01-19T16:46:25+5:302018-01-19T16:48:42+5:30

मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

Celebrate Marathi Literature and Culture - Chief Minister Devendra Fadnavis | मराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

यवतमाळ - मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

वणी येथील राम शेवाळकर परिसरात आयोजित 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिध्द दिग्दर्शक राजदत्त, स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, संमेलनाचे मुख्य संयोजक माधव सरपटवार, कार्याध्यक्ष वामन तेलंग, शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक शुभदा फडणवीस आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नगरीने साहित्यातील अनेक रत्ने दिली. ही वंदनाची भुमी आहे. ऐतिहासिक आणि साहित्यप्रेमी नगरीत हे संमेलन होत आहे. हा  अत्यंत आनंदाचा क्षण आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले लोकनायक बापुजी अणे, राम शेवाळकर आणि वसंत आबाजी डहाके यांची ही भुमी आहे. विदर्भात झाडीपट्टी, नाट्य महोत्सव, दंडार यासह वेगवेगळ्या नाट्यसंस्कृती रंगभुमीचे वेगळेपण येथे पहायला मिळते. कविवर्य सुरेश भट, ग्रेस यांनी मराठी मनाला वेड लावले. रसिकांच्या मनाला अत्यंत सुखद असे संमेलन येथे होत आहे. 
तीन दिवसांत अनेक परिसंवाद, कविसंमेलन, दोन अंकी नाटक येथे होत आहे. येथील साहित्य हे केवळ कल्पनाविलास नाही तर घडणा-या घटनांचे प्रतिबिंब त्यात उमटत असते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. समाजमाध्यमांमुळे मुलभूत साहित्य, समाजाला आकार देणा-या साहित्याचे काय होणार, याचा विचार येतो. मराठी माणसांमुळे येथील साहित्य आणि संस्कृती जिवंत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वणीकरांनी अतिशय चांगले संमेलन येथे आयोजित केले. या संमेलनाला मनापासून शुभेच्छा देऊन संमेलनाचे उद्घाटन झाले, असे त्यांनी जाहीर केले.
तर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे म्हणाले,  क्रांती घडवून आणण्याची ताकद लेखकांमध्ये आहे. वणी हे कामगार क्षेत्र असतांनाही येथे वाचनाची आवड आहे, ते येथे जमलेल्या गर्दीवरून दिसते. समाज घडविण्यामध्ये लेखकांचे योगदान महत्वाचे आहे. अनेक पुरातन साहित्य आजही उपलब्ध आहे. ही संतांची भुमी आहे. विदर्भाने अनेक मोठमोठे लेखक, कवी दिले, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वागतपर भाषण केले.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलन परिसरातील राम शेवाळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शेवाळकर दिपस्तंभाला भेट दिली. तसेच "बहुगुणी वणी" या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी केले. संचालन प्रा. अभिजित अणे यांनी तर आभार गजानन कासावार यांनी मानले.

Web Title: Celebrate Marathi Literature and Culture - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.