दूध पिऊन साजरे करा नवीन वर्ष
By admin | Published: December 28, 2015 04:09 AM2015-12-28T04:09:21+5:302015-12-28T04:09:21+5:30
तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये दारू हा महत्त्वाचा भाग असतो.
नागपूर : तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये दारू हा महत्त्वाचा भाग असतो. मात्र थांबा! दारूचा हा पहिला घोट तुमच्या व्यसनास कारणीभूत ठरू शकतो. यामुळे येणारे नवीन वर्ष दारूऐवजी दूध पिऊन साजरे करण्याचे आवाहन करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दूधवाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यसनमुक्तीच्या कार्यांतर्गत अंनिसच्या वतीने २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत व्यसनविरोधी निर्धार सप्ताह म्हणून पाळला जातो. याबाबत अंनिसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, डे साजरे करण्याच्या चलनामुळे समाजात व्यसनाला प्रतिष्ठा मिळाली आहे.
राज्याचा महसूल वाढविण्यासाठी व्यसनाला महत्त्व देण्याचे सरकारचे धोरणही दारूसारखे व्यसन वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या पाच आजारांपैकी नैराश्य हाही एक आजार आहे. हे नैराश्य व्यसनातूनच येते. यातून पुढे हिंसक वळण, मानसिक आजार व आत्महत्यासारखे प्रकार होतात. हे व्यसन जगायला अडथळा निर्माण करणारे आहे.
‘द’ दारूचा नाही तर, ‘द’ दुधाचा हा संदेश घेऊन अंनिसतर्फे नवीन वर्षाच्या स्वागतांतर्गत संस्थेच्या केंद्रात दुधाचे वाटप केले जाणार आहे. ३१ डिसेंबरला प्रत्येक शहरात अंनिसच्या शाखेमध्ये दूधवाटप केले जाणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले.
याशिवाय व्यसनाचे दुष्परिणाम चित्रित करणारे ‘प्रतीक्षा’ आणि ‘प्रतिज्ञा’ हे दोन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट यू-ट्यूबवर भारतातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांना व्सनापासून अलिप्त राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)