कोसबाड येथे जागतिक नारळ दिन साजरा
By admin | Published: September 3, 2016 11:04 AM2016-09-03T11:04:19+5:302016-09-03T11:05:43+5:30
जागतिक नारळ दिवसाचे औचित्य साधून राज्य नारळ विकास मंडल, पालघर येथे शेतक-यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.
- अनिरुद्ध पाटील
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. ३ - जागतिक नारळ दिवसाचे औचित्य साधून राज्य नारळ विकास मंडल, पालघर, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड, राज्य कृषि विभाग व जिल्हा नारळ उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी शेतकर्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. डहाणू प्रांत अधिकारी अंजली भोसले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या.पालघर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर जी पाटिल, उपविभागीय कृषि अधिकारी एस डी सावंत, डहाणू चे गट विकास अधिकारी रमेश औचार, नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष यज्ञेश सावे आदी मान्यवर उपस्थित होते.दिपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंजली भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करुन डहाणू भागातील शेतकऱ्यांनी नारळाचे विक्रमी उत्पादन करून डहाणूला नारळ उत्पादनात अग्रेसर करण्याचे आवाहन केले. नारळ विकास बोर्डचे डेप्युटी डायरेक्टर श्री अरावजी व नारळ विकास बोर्ड पालघर चे क्षेत्र प्रबंधक कुमारवेल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नारळ बोर्डच्या विविध योजना व नारळ संशोधना विषयी मार्गदर्शन केले. तसेच झाडावर चढण्याच्या शिडी च्या प्रशिक्षणाचे महत्व सांगितले. दरम्यान प्रगतिशील शेतकरी विनायक बारी, यज्ञेश सावे, रमेश अवचार यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आर जी पाटिल यांनी नारळ लागवड वाढवून व नारळाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन केले. ज्यामुळे नवीन रोजगार मिळेल. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी नारळ उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन याविषयी मागर्दर्शन केले तर प्रा गबाले यांनी नारळ लागवड याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नारळ बोर्डातर्फे नारळाचे विविध उत्पादने व माहितीचे प्रदर्शन ठेवले होते. उद्योजक योगेश राऊत यांनी नारळ शहाळे पासून स्वछ् नारळ पाणी काढण्याचे यंत्राचे प्रदर्शन ठेवले व सर्वांना मोफत नारळ पाणी दिले. सूत्रसन्चालन पालघरचे विभागीय कृषि अधिकारी एस डी सावंत यांनी केले व आभार प्रक्षेत्र प्रबंधक कुमारवेल यांनी केले. या कार्यक्रमाला एकूण शंभर शेतकऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ नालकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.