अहवाल ठेवताच भाजपा आमदारांचं सेलिब्रेशन, मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवरायांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:28 PM2018-11-29T13:28:21+5:302018-11-29T13:29:16+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला.
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तत्पूर्वीच भाजप नेत्यांनी विधानसभेत सेलिब्रशन सुरु केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज आरक्षण कृती समितीचा अहवाल विधासभेत सादर केला. या अहवालात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षणाचा अहवाल सादर होताच, भाजप आमदारांनी फेटे बाधून अन् पेढे भरवून सभागृहाबाहेर सेलिब्रेशन केलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारचा कृती अहवाल मांडला आहे. तसेच, याबाबतचे विधेयक पटलावर ठेवले आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले. फडणवीस विधानसभेत गड लढवत असताना, भाजपा आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन सेलिब्रेशन केलं. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 1 डिसेंबरला जल्लोष होणारच अशीही भावना भाजपच्या आमदारांनी बोलून दाखवली. दरम्यान, विधानसभेत आरक्षणाचा कृती अहवाल सादर करुन मुख्यमंत्रीही सभागृहाबाहेर आले असून सभागृहाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारा घालून नमन केलं आहे. यावेळी भाजपच्या मंत्र्यांसह सर्वच आमदार उपस्थित होते.