तासगावचा २३८ वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 06:56 PM2017-08-26T18:56:35+5:302017-08-26T18:57:09+5:30

तासगावचा ऐतिहासिक २३८ वा रथोत्सव शनिवारी पार पडला.

Celebration of Tasgaon 238th or the Historical Rathhotsav | तासगावचा २३८ वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा

तासगावचा २३८ वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा

googlenewsNext
ठळक मुद्दे तासगावचा ऐतिहासिक २३८ वा रथोत्सव शनिवारी पार पडला. श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे.

तासगाव, दि. 26 - मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरयाऽ मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबºयाची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला उधाण आलेले... अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २३८ वा रथोत्सव शनिवारी पार पडला. येथील श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन रथोत्सव सुरु केला. शनिवारी २३८ वर्षे पूर्ण झाली.
श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी रथापुढे असणाºया गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’ची घोषणा दिली.
रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. ‘मोरयाऽ... मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली. काही फूट पुढे गेल्यानंतर ओंडक्याच्या साहाय्याने रथ थांबविण्यात येत होता. काही वेळ विश्रांती व पुन्हा ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत भाविकांनी श्री काशिविश्वेश्वराचे मंदिर गाठले. रथापुढे हत्ती, बैलगाडी, सनई-चौघडे होते. स्त्री- पुरुषांचे झांजपथकातील विविध खेळ यावेळी सादर करण्यात आले. काही तरुणानी लक्षवेधी उंच मनोरे उभा करुन जयघोष केला.
केळीचे खुंट, नारळाची तोरणे, पताका, फुलांच्या माळा आदींनी रथ सजविण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाºया नागरिकांनी रथमार्गावर रांगोळी काढून रथाचे स्वागत केले.
गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाºया श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात येतो. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट होते व रथ परतीच्या प्रवासाला लागतो. त्याप्रमाणे श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला.
दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेश मंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती. सर्वत्र प्रसादाचे, नारळांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. रथयात्रेनंतर गणपती मंदिरात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांनी सर्व मानकºयांना मानाचे श्रीफळ दिले. उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
आमदार शंभूराजे देसाई, आमदार सुमनताई पाटील, खासदार संजयकाका पाटील, पटवर्धन कुटुंबीय व मानकरी यांच्यासह हजारो गणेशभक्तानी रथोत्सवात सहभाग घेतला.

लक्षवेधी ढोल
नयनरम्य सजावट केलेल्या रथावर भाविकांकडून गुलालाची उधळण होत होती. रथाच्या पुढील बाजूस  ढोलाच्या ठेक्यावर, स्री-पुरुषांचे ढोल पथक लयबद्धपणे ढोल वादन करत होते. हे ढोलपथक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
 

Web Title: Celebration of Tasgaon 238th or the Historical Rathhotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.