गोव्यात आॅक्टोबरपासून सोहळ्यांची धूम
By Admin | Published: September 12, 2016 04:25 AM2016-09-12T04:25:03+5:302016-09-12T04:25:03+5:30
आॅक्टोबरपासून गोव्यात अनेक मोठे सोहळे व उपक्रम होणार आहेत. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळू शकेल व जगभर गोव्याची नवी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसविता येईल
सदगुरू पाटील, पणजी
आॅक्टोबरपासून गोव्यात अनेक मोठे सोहळे व उपक्रम होणार आहेत. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळू शकेल व जगभर गोव्याची नवी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसविता येईल, असा विचार सरकारने केला आहे. सोहळे चांगल्या प्रकारे पार पडावेत, म्हणून गोवा सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
गोव्यात आतापर्यंत ज्या देशातील पर्यटक आले नाहीत किंवा खूपच कमी संख्येने आले, अशा देशांमध्ये जाहिरात करून तेथील पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
१५ व १६ आॅक्टोबरला गोव्यात प्रथमच ब्रिक्स परिषद होणार आहे. ब्रिटन, चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया आदी देशांतील सुमारे ९०० अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. या देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र व्यवहारमंत्री ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात दाखल होणार आहेत.
ब्रिक्स परिषदेचा लाभ गोव्याच्या पर्यटनाचा आलेख वाढविण्याच्या दृष्टीने निश्चितच होईल. त्यासाठी आम्ही विशेष परिश्रम घेत आहोत. ब्रिक्स परिषद आयोजिण्याचा मान गोव्याला प्रथमच लाभत आहे. पाहुण्यांना गोव्यातील पर्यटनस्थळे दाखविली जातील. त्यांच्यासाठी सरकार साइट सिंग टुर्स आयोजित करेल. गोव्यातील कला व सांस्कृतिक पथकांना त्यांच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाईल. त्यातून गोमंतकीय कला व संस्कृतीचे यथार्थ दर्शन विदेशातील पाहुण्यांना घडेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चीनसारख्या देशातून गोव्यात पर्यटक येतच नाहीत. ब्रिक्स परिषदेनिमित्त चीनमधून जे पाहुणे येतील, ते माघारी जाताना गोव्याची एक वेगळी प्रतिमा मनात घेऊन जातील, असेही ते म्हणाले. आॅक्टोबरमध्ये ब्रिक्स परिषद झाल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) प्रारंभ होईल. हजारो पर्यटक दरवर्षी इफ्फीचा लाभ घेतात.
डिसेंबरमध्ये नाताळ सणात जगप्रसिद्ध सेंट झेवियर फेस्त सुरू होतो. नाताळ व सेंट झेवियर फेस्तवेळी लाखो पर्यटक येतात.
इफ्फी, तसेच सेंट झेवियर सोहळ्यासाठी सरकार सोईसुविधा कमी पडू देणार नाही, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये जागतिक दर्जाचा संगीत नृत्य महोत्सव गोव्याच्या किनारपट्टीत होणार आहे. सुमारे पन्नास हजार पर्यटक त्याला भेट देतात. त्यात कोट्यवधींची उलाढाल होते. गोवा सरकारला मोठा महसूलही मिळतो. फेब्रुवारीत कार्निव्हलचा सोहळा होईल. कार्निव्हलपूर्वी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नववर्ष साजरे करण्यासाठी देशातील अनेक बडे उद्योगपती, राजकारणी, कलावंत सहकुटुंब गोव्यात येतात.