सेलीब्रिटींचा व्हॅलेंटाइन...

By admin | Published: February 13, 2016 10:27 PM2016-02-13T22:27:52+5:302016-02-14T10:23:51+5:30

‘व्हॅलेंटाइन डे’ हा कॉलेजमधल्या तरुणांचा प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस तर असतोच; परंतु सर्वसामान्यही हा दिवस सेलीब्रेट करतात. मग मालिका, नाटक आणि चित्रपटांत

Celebrities valentine ... | सेलीब्रिटींचा व्हॅलेंटाइन...

सेलीब्रिटींचा व्हॅलेंटाइन...

Next

‘व्हॅलेंटाइन डे’ हा कॉलेजमधल्या तरुणांचा प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस तर असतोच; परंतु सर्वसामान्यही हा दिवस सेलीब्रेट करतात. मग मालिका, नाटक आणि चित्रपटांत चमकणारे कलावंतही यामध्ये मागे कसे राहतील? याच ‘व्हॅलेंटाइन डे’बद्दल या चमचमत्या ताऱ्यांना काय वाटते, याचे हे प्रतिबिंब...

पूर्वा गोखले : आपलं सध्याचं आयुष्य इतकं धावपळीचं आहे की त्यातून एखादा दिवस असा सेलीब्रेट करायला मिळत असेल, तर काहीच हरकत नाही. जसं आपण देवळात जातो, तिथे आपल्याला वेगळी एनर्जी मिळते; तसंच या दिवसाचं आहे. हे वातावरण छान असतं. मी हा दिवस साजरा करतेच असे नाही. मुलांसोबत मी बाहेर जेवायला वगैरे जाते. पण व्हॅलेंटाइन डे आहे म्हणून तो सेलीब्रेट करायला हवा किंवा करायला नको असं काही माझं मत नाही.

रेश्मा रामचंद्र :
व्हॅलेंटाइन डे मी खास साजरा करतेच असे नाही. कॉलेजमध्ये असताना मात्र या दिवसाचे आकर्षण होते. पण आपण जसजसे मोठे होत जातो; तसतसे हा एकच दिवस लक्षात ठेवून एक्स्प्रेस व्हावे असे काही मला वाटत नाही. त्या वयात ती एक मजा असते आणि त्या वेळी प्रेम एक्स्प्रेस करणे ही वेगळी गोष्ट असते. मात्र या सेलीब्रेशनला माझा विरोध नाही. यामुळे युथच्या मनातून त्यांची एक्स्प्रेशन्स बाहेर पडत असतील, तर हा दिवस साजरा करायला काही हरकत नाही. प्रेम ही गोष्ट युनिव्हर्सल आहे; त्यामुळे त्यासाठी एखादा खास दिवस असावा असे काही नाही आणि नसावा असेही काही नाही. कारण प्रेमभावना ही कायमस्वरूपी असते.

प्रिया मराठे : मी आणि माझा नवरा आमच्या व्यस्त दिनक्रमातून कमी भेटतो. पण आम्ही प्रेमभावनेने बांधले गेलो आहोत. केवळ व्हॅलेंटाइन डेलाच प्रेम करावे असे काही आमचे नसते. जेव्हा आम्हाला वेळ मिळतो, तेव्हा आम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करतो. दरवर्षी मी त्याच्यासाठी केक किंवा एखादे गिफ्ट वगैरे आणत असते. पण या वर्षी मात्र मी स्वत: केक ‘बेक’ करून त्याला सरप्राईज देणार आहे.

योगिनी चौक : व्हॅलेंटाइन डेला मी खास प्रेमाचा दिवस असं काही मानत नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा प्रेमानं व आनंदानं जगण्याचा दिवस असतो आणि तसा तो मी जगत असते. पण तरीसुद्धा या दिवशी मी अंधशाळेतल्या मुलांना भेट देणार आहे. प्रेम हे माणूस म्हणून आपण प्रत्येकावरच करतो आणि त्यामुळे मी या मुलांना प्रेमाची भेट देणार आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. या मंडळींबरोबर बोलायला कुणी नसते. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना खूप आपुलकी वाटली होती.

भक्ती रत्नपारखी : व्हॅलेंटाइन डे मी तसा नेहमी सेलीब्रेट करत नाही. आमचं लग्न झालं त्यानंतर पहिल्या वर्षी मी तसा प्रयोग करून पाहिला. पण निखिलला ते फारसं आवडलं नाही असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे पुढे मी त्यात फारसा इंटरेस्ट घेतला नाही. त्याचं असं म्हणणं पडलं की, आपला व्हॅलेंटाइन डे एकच दिवस नसतो. पण यंदा मला हा दिवस सेलीब्रेट करावासा वाटतोय, कारण ‘बुलेट ट्रेन’ मालिकेच्या निमित्ताने मला छान माणसे भेटली आहेत. मी हा दिवस या वर्षी या मंडळींसोबत साजरा करणार असल्याने तो स्पेशल आहे.

ऋजुता देशमुख
व्हॅलेंटाइन डे सगळे जण व्हॅलेंटाइनसोबत साजरा करतात. नवऱ्याला आणि मला या दिवशी वेळ असेल तर आम्हीसुद्धा हा दिवस साजरा करतो. आता मुलगी झाल्यावर आम्ही तिघे जण हा दिवस सेलीब्रेट करतो, एन्जॉय करतो. पण दरवर्षी सेलीब्रेट करूच असे नाही. कॉलेजची मुले ज्या प्रकारे हा दिवस सेलीब्रेट करतात ते पाहायला मला खूप आवडते.

अलका कुबल आठल्ये
व्हॅलेंटाइन डेबद्दल मी निगेटिव्ह बोलणार नाही; कारण हा बदलत्या काळाचा परिणाम आहे. आमच्या वेळीसुद्धा व्हॅलेंटाइन डे होता. मला समीरने लग्नाच्या आधी मस्त साडी गिफ्ट दिली होती. पण आताचा व्हॅलेंटाइन डे थोडा ‘ओव्हर’ वाटतो. पण तेही आता आपण स्वीकारायला हवे. फक्त यात काही गैरप्रकार होता कामा नयेत. हा दिवस केवळ एकच दिवस साजरा न करता, आयुष्यातला प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असला पाहिजे अशी भावना मनात हवी. वर्षभर भांडायचे आणि केवळ एका दिवशी प्रेम व्यक्त करायचे असे होता कामा नये. दोघांनीही समजूतदारपणा दाखवायला
हवा.

सोनाली पंडित
व्हॅलेंटाइन डे ही कॉंन्सेप्ट मला फारशी पटत नाही. माझ्यासाठी रोजचा दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो. रोजचा दिवस मी माझा नवरा आणि मुलीबरोबर सेलीब्रेट करते. त्यामुळे प्रत्येक दिवस हा माझा व्हॅलेंटाइन डे असतो.

संतोष पवार :
मला या दिवशी कुणी ‘विश’ केलं तर मीसुद्धा त्यांना ‘विश’ करतो. पण मुद्दाम असे मी काही करत नाही. प्रेम ही केवळ एकाच दिवशी दाखवण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या आचरणातून रोजच दिसली पाहिजे. आपलं प्रेम जेव्हा कुणाला कळत नाही, तेव्हाच ते दाखवून द्यायची वेळ येते. पण आयुष्यभर इतरांवर प्रेम केलं, तर अशी वेळ कधी येणार नाही.

अंशुमन विचारे :
मी हा दिवस अजिबात साजरा
करत नाही. कारण या एका दिवशीच प्रेम दाखवावं असं काही मला वाटत नाही. या दिवसाच्या निमित्ताने जी राजकीय पोळी भाजून घेतली जाते, त्याचाही मला राग आहे. मला असे वाटते की एक माणूस म्हणून प्रेमभावना ही रोजचीच असायला हवी. माणूस म्हणून आपण काही शिकलो तर रोजच व्हॅलेंटाइन डे होईल. मुळात आपण आपली संस्कृती विसरता कामा नये.

मयूरेश पेम :
व्हॅलेंटाइन डे मला खूप आवडतो आणि मी हा दिवस साजरा करतो. पण मला कुणी गर्लफ्रेण्ड नसल्याने मी तो मित्रांसोबत एन्जॉय करतो. हा दिवस गर्लफ्रेण्ड किंवा बॉंयफ्रेण्डशीच संबंधित असला पाहिजे असे मला वाटत नाही. आपण मनापासून ज्यांच्यावर प्रेम करतो; म्हणजे आई-बाबा, मित्र अशा सगळ्यांबरोबर हा दिवस साजरा करायला मला आवडते. ‘टू शेअर लव्ह’ हे मला महत्त्वाचे वाटते.

मंगेश देसाई : व्हॅलेंटाइन डे साजरा करावा असे मला वाटते. पण तो केवळ प्रेयसीसाठी नव्हे; तर ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे त्यांनी तो साजरा करावा. आई-वडील, मुले, मित्र यांनी तो साजरा करावा. १४ फेब्रुवारी हा दिवस सर्वांनी सेलीब्रेट करावा असे मला वाटते. मीसुद्धा हा दिवस सेलीब्रेट करतो. माझ्या जवळच्या मित्रांना फोन करून मी शुभेच्छा देतो. या वर्षीसुद्धा मी तेच करणार आहे.

Web Title: Celebrities valentine ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.