सेलिब्रिटींनो, नाट्यगृह दत्तक घ्या!
By admin | Published: February 8, 2015 11:35 PM2015-02-08T23:35:55+5:302015-02-08T23:35:55+5:30
नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत एकत्र येतात. संकल्पनांची आदान-प्रदान होते. सर्वच कल्पनांना नियामक मंडळाचे व्यासपीठ लाभत नाही
बेळगाव : नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत एकत्र येतात. संकल्पनांची आदान-प्रदान होते. सर्वच कल्पनांना नियामक मंडळाचे व्यासपीठ लाभत नाही किंवा त्यावर ठरावाने शिक्कामोर्तबही होत नाही. परंतु काही कल्पना या साऱ्यांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात आणि त्यावर संबंधितांनी गांभीर्याने विचारही करायचा असतो. यशस्वी कलावंतांनी नाट्यगृहे देखभालीसाठी दत्तक घ्यावीत, ही सांगलीचे शफी नायकवडी यांची संकल्पना अशीच...
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य असलेले नायकवडी मंडळाच्या निर्णयांवर मुंबईचा वरचष्मा असतो, असे सांगतात.
नाट्य परिषदेचे राज्यभरात साडेएकोणीस हजार सदस्य आहेत. तथापि, नाटक ज्याप्रमाणे महानगरांपुरतेच सीमित राहिले, तसेच परिषदेचे निर्णयही बहुतांश मुंबई-पुण्यापुरतेच सीमित राहतात. वस्तुत: प्रत्येक शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंवा काही ठिकाणी खासगी नाट्यगृह असतेच. बहुतांश नाट्यगृहांची अवस्था देखभालीअभावी बिकट झालेली असते. सोयीसुविधांचा अभाव असतो. अनेक रंगकर्मी या नाट्यगृहांमध्ये प्रयोग करूनच मोठे झालेले असतात. अशा यशस्वी कलावंतांनी किमान मूळ शहरातले नाट्यगृह देखभालीसाठी दत्तक घ्यायला काय हरकत आहे, असा नायकवडींचा प्रश्न!
खासगी नाट्यगृहे दत्तक मिळण्याची शक्यता कमी असली, तरी पालिका-महापालिका नाट्यगृहे दत्तक देऊ शकतील. तेथे कमी असलेल्या सोयीसुविधा पुरविणे, देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करणे, सुशोभीकरण यासाठी फारशी रक्कम खर्ची पडणार नाही.
कलावंत तेवढा खर्च नक्की करू शकतील, अशी संकल्पना नायकवडी यांनी अनौपचारिक गप्पांत सांगितली. (खास प्रतिनिधी)