सिमेंटचे दर पहिल्यांदाच महागले तब्बल शंभर रुपयांनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:37 AM2019-04-10T05:37:44+5:302019-04-10T05:37:58+5:30
परवडणाऱ्या घरांच्या योजनेवर होणार परिणाम
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सिमेंटचे प्रतिगोणी दर तब्बल ४० टक्के म्हणजेच १०० रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीचा परवडणाऱ्या घरांच्या योजनेला फटका बसणार आहे. सिमेंट कंपन्यांनी निवडणुकीसाठी फंड दिल्यामुळे त्याची भरपाई ग्राहकांकडून करण्यात येत असल्याची व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.
दीड महिन्यापूर्वी ५० किलो वजनाची सिमेंटची गोणी २६० ते २८० रुपये विकली जात होती. तिचा दर आता ३६० ते ३८० रुपयांपर्यंत केला आहे. औरंगाबाद सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, एरव्ही भाव ५ ते १० रुपये कमी-जास्त होतात, पण पहिल्यांदाच दीड महिन्यात ११५ ते १३० रुपयांनी सिमेंट महाग होऊन किमती ४०० रुपयांच्या जवळ पोहोचल्या आहेत. त्यामुळे सिमेंटपासून तयार होणारे पाइप, टाइल्स, पेव्हरब्लॉक आदींच्या किमतीही वाढल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना जीएसटीवर ६ टक्के रिबेट मिळत असे. १ एप्रिलपासून ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे फ्लॅटमागे साडेतीन लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. परवडणाºया घरांच्या योजनांचे बजेटही महागणार आहे.
क्रेडाईची टीका
सिमेंट बनविण्यासाठी लागणाºया कोणत्याही कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही, तरीही सिमेंटच्या दरांमध्ये अनपेक्षित वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम रेडिमेड क्राँकीट, फरशी, विटा आदींवर होणार आहे. बांधकामाचा खर्च वाढणार आहे. सरकारने सिमेंटचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तशी मागणी आम्ही सरकारला करणार आहोत.
- राजीव परीख, अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र