सेन्सॉर बोर्डाविरुद्ध लढा द्यावाच लागेल!
By Admin | Published: March 23, 2017 03:31 AM2017-03-23T03:31:42+5:302017-03-23T03:31:42+5:30
दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला.
पुणे : दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला. प्रत्येक पिढीला स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागेल, असे परखड मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले.
डिजिटल युगात चित्रपटाचा आशय विविध माध्यमांतून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डचे अस्तित्व काहीसे कमी झाले आहे. मात्र, स्वत:च्या चित्रपटांबाबत वैयक्तिक पातळीवर संवेदनशीलता जोपासण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे एनईसीसी, युनिसेफ आणि यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समीट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल आॅफ द लाइन्स’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, दिव्या दत्ता, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा आदी परिसंवादात सहभागी झाले होते.
१९८४ मध्ये शबाना आझमी यांच्यासमवेत केलेला ‘अर्थ’ ते २०१७ चा विद्या बालनचा ‘बेगमजान’ हा खूप मोठा प्रवास आहे. ‘उडता पंजाब’च्या पार्श्वभूमीवर ‘बेगमजान’ला सेन्सॉर बोर्डकडून काय कात्री लावली जाईल, याची धाकधूक होती. मात्र, केवळ दोन साधे बदल सुचविण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्या बालन म्हणाली, मी आजवर अनेक भूमिका केल्या; मात्र ‘बेगमजान’मधील भूमिका पेलली आणि जगलीही. महिलांनी आयुष्यात थोडीशी बंडखोरी दाखवायलाच हवी. मनात अनेकदा संताप साठलेला असतो. माझ्या बाबतीतही ‘बेगमजान’ चित्रपट करताना असेच घडले. यातील अनेक संवाद जणू मलाच म्हणायचे आहेत, असे वाटत होते. ‘बेगमजान’च्या संवादांमध्ये क्रौर्य आहे, राग आहे; परंतु तिच्या भावना खऱ्याखुऱ्या आहेत. त्यामुळे हे संवाद म्हणताना अवघडल्यासारखे झाले नाही. (प्रतिनिधी)
महिलांनी ठाम भूमिका घ्यावी - विद्या-
महिला ‘नॅचरल गिव्हर्स’ आहेत. त्या नेहमी इतरांचा विचार करतात; पण मला काय वाटते, याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही. स्वत:च्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करायची असेल, तर समाज काय म्हणेल? लोक काय विचार करतील, असे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात. मात्र, महिलांनी स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडण्याची भूमिका घ्यायला हवी, असे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले.