‘सेन्सॉरशिप’ लादली जातेय
By admin | Published: August 8, 2016 01:06 AM2016-08-08T01:06:42+5:302016-08-08T01:06:42+5:30
हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ : हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही. एक ‘व्यक्ती’ म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे. जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याला मान्यता दिली जात नसेल आणि त्याला नाकारले जात असेल तर ते समाजाच्या दृष्टीने हानीकारक आहे, असे सांगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘सेन्सॉरशिप’ लादली जात असल्याचे सांगितले.
पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने रत्नाकर मतकरी यांना प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते रविवारी ‘इंदिरा भालचंद्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून मतकरी त्यांच्याशी संवाद साधला.
पूर्वीच्या आणि आत्ताच्या सेन्सॉरशिपमध्ये फरक आहे. प्रत्येक नाटकाला होणारा विरोध हा वेगळा आहे. त्याचे मतप्रवाह तपासले गेले पाहिजेत. पण सध्या अप्रत्यक्षपणे सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे सांगून राजकारण, समाजकारण आणि प्रेक्षकांच्या अभिरूचीच्या खालावलेल्या दर्जावर टीका करताना मतकरी म्हणाले, ‘‘राजकारण, समाजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे, मग नाटकही त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षणाचाही दर्जा खालावत आहे. पूर्वी शिक्षणपद्धतीमध्ये पाठ्यपुस्तकाच्या पलीकडची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र, असे शिक्षकच आता दिसत नाहीत. अशाच शिक्षकांच्या हातून पिढी गेली असल्याने त्यांच्याकडून अभिरूचीची अपेक्षा कशी करायची? तरीही खानदानी प्रेक्षक अजूनही आहे ज्यांना अजूनही वैचारिक नाटक हवे आहे.