शंभरावर सूक्ष्म निरीक्षक
By admin | Published: May 10, 2014 07:12 PM2014-05-10T19:12:50+5:302014-05-10T19:12:50+5:30
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून मतमोजणीत कसलीही गफलत होऊ नये यासाठी १०८ सूक्ष्म निरीक्षकां (मायक्रो आॅब्झर्व्हर)ची नेमण्यात आले आहे.
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून मतमोजणीत कसलीही गफलत होऊ नये यासाठी १०८ सूक्ष्म निरीक्षकां (मायक्रो आॅब्झर्व्हर)ची नेमण्यात आले आहे. त्यांचे मतमोजणीवर बारीक लक्ष राहणार आहे. या शिवाय ११८ मतमोजणी पर्यवेक्षक, १२० मतमोजणी सहायक व ११६ शिपाई अशा एकंदर ५८४ अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वीही प्रशिक्षण देण्यात आले असून १० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सूक्ष्म निरीक्षकांना तर दुपारी १२ वाजता अन्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३३६ कर्मचार्यांची गरज आहे. मात्र राखीव स्वरूपातही कर्मचारी तैनात असणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलावर प्रत्येक एक पर्यवेक्षक, मतमोजणी निरीक्षक , सहायक व शिपाई असे एकूण चार कर्मचारी असणार आहेत. चक्करबर्डी परिसरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार असून त्यासाठी नियुक्त सर्व कर्मचार्यांना तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही ओळखपत्र देण्यात आले आहे. कर्मचार्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीप्रमाणेच मतमोजणी वेळीही निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केंद्रीय निरीक्षक जी. सथ्यवती, खर्च निरीक्षक श्रीवास्तव आदी उपस्थित राहणार असून ते १४ मे रोजी येथे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० रोजी वरिष्ठाधिकारी या कर्मचार्यांना मार्गदर्शन करणार आहेत.