शताब्दी नियोजनाला मुहूर्त नाही
By admin | Published: October 6, 2015 02:13 AM2015-10-06T02:13:18+5:302015-10-06T02:13:18+5:30
साईसमाधी शताब्दी अविस्मरणीय होण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची अद्याप बैठकच झालेली नाही. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सोहळ््यासाठी
- प्रमोद आहेर, शिर्डी
साईसमाधी शताब्दी अविस्मरणीय होण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची अद्याप बैठकच झालेली नाही. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सोहळ््यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचे तसेच स्थानिक पातळीवरही सामसूम असल्याचे चित्र आहे़
३० सप्टेंबर २०१७ ते १९ आॅक्टोबर २०१८ कालावधीत साईसमाधी शताब्दी सोहळा होणार आहे़ हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय व्हावा, शिर्डीच्या मंदावलेल्या अर्थकारणाला गती मिळावी, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या राहाव्यात, यासाठी हा सोहळा महापर्वणी ठरू शकतो़ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समिती स्थापन केली होती, मात्र समितीची एकही बैठक झाली नाही़
साई संस्थानला राज्यातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. त्यांच्याकडून विकास योजनांसाठी पैसा घ्यायचा, मात्र संस्थानच्या प्रश्नांबाबतच्या निर्णयासाठी सरकारने अर्धा ताससुद्धा वेळ काढायचा नाही़, असा आजवरचा अनुभव आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी एका प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची शताब्दी सोहळ््यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. पण त्यांच्या नियुक्तीचा आदेशही शिर्डीपर्यंत पोहचलेला नाही़
शताब्दी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन, घोषवाक्य व बोधचिन्ह तयार करून आतापासूनच त्याचा प्रचार व्हायला हवा़, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. संस्थानच्या निधीतून सुरू असलेला तीन किमी लांबीचा रस्ता पाच वर्षांतही पूर्ण झालेला नाही़ येथील विकासकामांच्या गतीची ही बोलकी उदाहरणे आहेत़
संस्थान व नगरपंचायतीने स्थानिकांच्या सूचना विचारात घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने आराखडा बनवायला हवा. पक्षभेद विसरून सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी मांडले.