मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला

By admin | Published: August 30, 2016 04:06 PM2016-08-30T16:06:02+5:302016-08-30T16:06:02+5:30

दक्षिण मुंबईत जुन्या इमारती कोसळणं हे दरवर्षी पावसाळ्यात ठरलेलंच असतं, मग दुपारी एक निरोप आला... अरे, २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळलीय.

The center of the labor movement in Mumbai collapsed | मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला

मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला

Next
>- संजीव साबडे/ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 30 - दक्षिण मुंबईत जुन्या इमारती कोसळणं हे दरवर्षी पावसाळ्यात ठरलेलंच असतं. तशीच एक इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. त्याचा फारसा धक्का बसला नाही. त्यातही ती आधीच रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही, हे वाचून बरं वाटलं. मग दुपारी एक निरोप आला... अरे, २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळलीय. 
 
खरं तर या पत्त्यावरून अगदी मुंबईकरांनाही फारसा बोध होणार नाही. तरीही २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळली, हे कळताच धक्का बसला. सलग तीन वर्षं त्या इमारतीत जाणं होतं. ती इमारत म्हणजे मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होती. मुंबईतील हॉटेल कामगार, थिएटर कामगार, महापालिका शिक्षक, अग्निशामक दल कर्मचारी, महापालिका नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ, महापालिका कामगार व कर्मचारी, बेस्ट कामगार, फेरीवाले, गुमास्ता, टॅक्सीवाले या साऱ्यांच्या आंदोलनांचं ते केंद्रच होतं बरीच वर्षं. वास्तविक कामगार चळवळीचं केंद्र गिरगावात हे आश्चर्य वाटण्यासारखं. पण तसं होतं खरं. 
 
एके काळी ज्यांच्या आवाहनानुसार अवघी मुंबई बंद व्हायची, कामगार अचानक संपावर जायचे, ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या बॉम्बे लेबर युनियन, म्युनिसिपल मजदूर युनियन यांचं मुख्यालय म्हणजे २0४ राजा राममोहन राय मार्ग. बाळ दंडवते, अण्णा साने, शरद राव, सोमनाथ डुबे, प्रभाकर मोरे, महाबळ शेट्टी, गोपाळ शेट्टी हे सारे लेफ्टनंट इथे असायचे. बेस्ट वर्कर्स युनियनचं ऑफिस अन्यत्र असलं तरी जॉर्ज येताच, नारायण फेणाणी इथं यायचे. फेरीवाले आणि गुमास्त्यांचे नेते जगन्ना पाठक हेही हजर व्हायचे. शिक्षकांचे नेते रमेश जोशीही इथं बसायचे काही काळ. याशिवाय संयुक्त समजवादी पक्षाचे (म्हणजे लोहियावादी) आणि नंतर समाजवादी पक्षाचे नेतेही इथं यायचे. त्यात मधु लिमये, मृणाल गोरे, रणजीत भानू, कधी तरी शरद यादव, वगैरेही यायचे. 
हे सारं १९७५ पर्यंत सुरू होतं. आणीबाणी लागू होताच जॉर्ज आणि त्यांचे बहुसंख्य साथी अंडरग्राउंड झाले. नंतर जनता पार्टीचं सरकार आलं आणि मंत्री झालेल्या जॉर्जचंही इथे येणं कमी होत गेलं. तेव्हा बाळ दंडवते, शरद राव यांच्याकडे सूत्रं आली होती.
 
 या इमारतीच्या समोर बॉम्बे बुक डेपो होता. मध्यंतरी तोही दिसला नाही. जवळच लाखाणी बुक डेपो होता. तोही हल्ली दिसत नाही. २0४ च्या समोरच प्रख्यात कुलकर्णी भजीवाले होते. अनेकदा शरद राव तिथल्या बाकड्यावर बसून भजी खायचे. ते बंद झालं. खटाववाडीच्या कॉर्नरला एक सेंट्रल रेस्टॉरंट होतं. तेही बंद झालं. वीरकर, कोना, मॉडर्न ही मराठी रेस्टॉरंटही बंद झाली. २0४ च्या बाजूला अभ्यंकर टायपिंग इन्स्टिट्यूट होती. युनियनची टायपिंग, सायक्लोस्टायलिंग ही कामं तिथं चालायची. आता तिथं टायपिंग नाही, पण अभ्यंकरांची कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तिथं. जॉर्ज या ऑफिसात असले की शेजारच्या सत्कारमध्ये मासे खायला हमखास जायचे. तेही खूप बदललंय म्हणे. 
इथंच जॉर्जच्या डोक्यात कामगारांची बँक सुरू करण्याची कल्पना आली आणि बॉम्बे लेबर बँक सुरू झाली. टॅक्सी, रिक्षासाठी सरकारी बँका सहजासहजी कर्ज द्यायच्या नाहीत. इथं मात्र ती सोय झाली. आता ती न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. रेल्वेच्या १९७४ च्या अभूतपूर्व संपाच्या बैठकाही इथंच झाल्या आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांना लोकसभा निवडणुकीत जॉर्जने याच भागातून पराभूत केलं. नंतरच्या निवडणुकीत मात्र जॉर्ज पराभूत झाले. आता जॉर्ज फर्नांडिस दिल्लीत अतिशय आजारी अवस्थेत आहेत. म्हणे, लोकांना ओळखतही नाहीत. शरद राव यांची प्रकृतीही बरी नसते. बाळ दंडवते वारल्यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियनचं ऑफिस डिलाइल रोडवर बाळ दंडवते स्मृतीमध्ये हलवण्यात आलं. २0४ , राजा राममोहन राय इथं सध्या युनियनचं काहीच नव्हतं. इमारतच रिकामी करण्यात आली होती. जुनी इमारत. कधी तरी पडणारच होती. पण तिथं अनेक आठवणी मात्र जाग्या केल्या.
 

Web Title: The center of the labor movement in Mumbai collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.