केंद्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नाही
By admin | Published: August 23, 2016 07:57 PM2016-08-23T19:57:20+5:302016-08-23T19:57:20+5:30
संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ : संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भुमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी केले. भाजपाच्या विभागीय कार्यायलयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. सामान्य मनुष्याचे महागाईने कंबरडे मोडले असताना देशात डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
देशात डाळ सोडली तर गहू, तांदूळ, तेल इत्यादी गोष्टी स्वस्त आहेत. डाळीचे उत्पादनच कमी झाले आहे. डाळीच्या पिकाला नीलगाय तसेच इतर जनावरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे किंमती वाढलेल्या आहेत. परंतु उत्पादन वाढवून आणि आयात केल्याने डाळीच्या किंमती नियंत्रित होऊ शकतात. डाळीच्या किंमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलत आहे, असेदेखील ते म्हणाले. गहू, तांदूळ यांचे भाव वाढलेले नाहीत. त्यामुळे या गोष्टी महाग झाल्या आहेत, असे म्हणणे योग्य होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.
जीएसटी विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहे. आसाम व बिहार या २ राज्यांच्या विधानसभेतदेखील याला मंजूरी मिळाली आहे. इतर राज्यदेखील याबाबतीत सकारात्मक असून २ महिन्यांत सर्व राज्यांतून मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.