Petrol, Diesel Rate: केंद्राने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले; राज्याला एका झटक्यात ३१०० कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:37 AM2021-11-05T06:37:19+5:302021-11-05T06:37:32+5:30
Petrol, Diesel Rate cut may harm Maharashtra: केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राने दर घटविल्याने राज्य शासन आकारत असलेला मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी झाल्याने राज्य सरकारच्या वार्षिक महसुलात ३,१०० कोटी रुपयांची घट होणार आहे.
कपातीनंतर केंद्राचा अबकारी कर प्रतिलीटर २७.९ व प्रतिलीटर २१.८ रु. इतका होणार आहे. डिझेलवरील राज्याचा व्हॅट २३.१ रुपयावरून २०.४ रुपये म्हणजे २.४० रुपये इतका कमी करण्यात आला आहे. पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलीटर ३१.९ रुपयांवरून ३०.६ रुपये इतका करण्यात आला आहे. म्हणजे १.३० रुपये इतकी कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ५ मे २०२० रोजी पेट्रोलवरील अबकारी कर १० रुपये, तर डिझेलवरील अबकारी कर १३ रुपये प्रतिलीटर वाढविला होता. आता जी कपात केली आहे ती पेट्रोलसाठी पाच रुपये आणि डिझेलसाठी १० रुपये एवढी आहे. v केंद्र सरकारनेही राज्याचा कित्ता गिरवून पेट्रोलवरील अबकारी कर ५ रुपयांनी आणि डिझेलवरील अबकारी कर ३ रुपयांनी कमी करावा. म्हणजे ५ मे २०२० रोजी केलेली वाढ पूर्णत: मागे घ्यावी, अशी मागणी राज्य शासनाने केली आहे.
राज्याने वाढवले होते तीनदा सेस
सात-आठ वर्षांपूर्वी दुष्काळाचे कारण देत राज्य शासनाने पेट्रोल झेलवर लीटरमागे दोन रुपये सेस लावला होता. तसेच, जून २०२० मध्ये कोरोनाच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी २ रुपये सेस वाढविण्यात आला होता. ५०० मीटरच्या नियमांमुळे दारुची दुकाने मोठ्या प्रमाणात बंद झाली तेव्हा मोठा फटका बसला होता. त्यावेळी पेट्रोलवरील सेस २ रुपये वाढवला होता. हे सेस कमी करता येतील, असे जाणकारांचे मत आहे.