केंद्र, राज्य सरकार टिष्ट्वटरवर चालते : तटकरे

By admin | Published: August 18, 2015 11:10 PM2015-08-18T23:10:37+5:302015-08-18T23:10:37+5:30

जोरदार टीका : महामार्ग डागडुजीबाबत सोयरसुतकच नाही

Center, state government runs on storm: Tatkare | केंद्र, राज्य सरकार टिष्ट्वटरवर चालते : तटकरे

केंद्र, राज्य सरकार टिष्ट्वटरवर चालते : तटकरे

Next

चिपळूण : कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव महिन्यावर आला असताना मुंबई - गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. केंद्र व राज्य सरकारला त्यांचे सोयरसुतक नाही. आघाडी सरकार एक महिन्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करुन महामार्गाची डागडूजी करत असे. परंतु, या सरकारने अद्याप कोणत्याही हालचाली केलेल्या नसल्याचे सांगून हे सरकार टिष्ट्वटरवर चालते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्र व राज्य सरकारला जनतेचे प्रश्न समजले नाहीत. त्यांना प्रश्नांचे गांभीीर्य नाही. सहकार समजला नाही. सभागृहात मुख्यमंत्री अनेक प्रश्नांची उत्तरे न देता ती प्रलंबित ठेवतात. या सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखवून यांनी लोकांना गंडवले. आता आम्हा सर्वांना एकत्र यायला हवे. नियतीने आम्हाला तशी संधी दिली आहे. आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन याचा मुकाबला करू, असे तटकरे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवरील आरोपांबाबत ते म्हणाले, आम्ही केव्हाही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. सत्य जनतेसमोर यायला हवे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आम्ही सत्तेत असताना गणेशोत्सवाच्या काळात महिनाभर अगोदर रस्त्यावर उतरुन पाहणी करत होतो. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना केली जात होती. परंतु, या सरकारने अद्याप काहीही केलेले नाही. जे मंत्री आहेत त्यांना आपले अधिकार समजत नाहीत. ते काम करत नाहीत. त्यामुळे जनतेला वेठीस धरले जात आहे. आंबा व काजू नुकसानीबाबत ते म्हणाले, आघाडी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. तेच आता सुरु आहे. मार्चमधील अधिवेशनात आपण आंबा नुकसानीबाबत भूमिका मांडली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी जूनमध्ये निर्णय जाहीर केला. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. तेथे सरकारने १४ सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहे. त्याच धर्तीवर कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मी स्वत: कोकणात येऊन राष्ट्रवादीचे आंदोलन करेन. आपल्याकडील कुटुंब व्यवस्थेच्या प्रश्नामुळे २० टक्के रक्कम शासनाला परत जाते, यालाही त्यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याबाबत समाजाच्या विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पुरस्कार कोणाला द्यायचा, हा सरकारचा अधिकार आहे. परंतु, ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्यावरुन जनतेच्या काही अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकारने आपली भूमिका जाहीर करायला हवी, असे तटकरे यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या पक्षाला १९९९ नंतर प्रथमच विरोधी पक्षात बसण्याची संधी मिळाली. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत पक्ष बांधणी करण्याचे अवघड आव्हान आपल्यासमोर आहे. शासन जे निर्णय घेते त्याविरोधात प्रभावीपणे आपली भूमिका मांडली जाईल. विधान परिषदेत आम्ही सरकारचा मुकाबला करतो. परंतु, विधानसभेत सरकार आपला आवाज दाबते. पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते. या कार्यकर्त्यांना धीर देऊन त्यांना उभारी देऊन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करते. कोकणातही आमची स्थिती मजबूत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.
आंबा नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करणार.
भाजप युती सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास.
संघटना मजबूत करणार.
आमदार रमेश कदम यांच्यावर कारवाई अटळ.
बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी.

Web Title: Center, state government runs on storm: Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.