मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० फेऱ्या वाढवणार
By admin | Published: May 9, 2017 02:12 AM2017-05-09T02:12:13+5:302017-05-09T02:12:13+5:30
मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन वेळापत्रकात मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० लोकल फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या संबंधी टिष्ट्वट करुन प्रभू यांनी मुंबईकराना खुश केले आहे.
रेल्वे बोर्डाचे वाहतूक सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुख्यालयात उपनगरीय रेल्वेचा आढावा घेतला. यावेळी मुंबई मंडळाचे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी उपनगरीय प्रकल्पांची माहिती जमशेद यांना दिली. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी एमआरव्हीसीच्या कामांचा तपशील सादर केला. पश्चिम रेल्वे मुंबई मंडळाचे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेच्या प्रगतीचा आलेख सादर केला.
विशेष टीम
या रेल्वे मार्गावरील समस्यांवर अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी विशेष टीम तयार करण्याचा सल्ला जमशेद यांनी यावेळी दिला. यात दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा प्रयत्न, उपनगरीय स्थानकांतील प्रवाशांची मागणी व त्यांच्या प्रवासाच्या वेळा, उपनगरीय मार्गावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करणे या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जमिन अधिग्रहणामुळे रखडलेल्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे राज्य सरकारसह समन्वय साधत आहे.