केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मीरारोडची भावना यादव देशात १४ वी, तर मुलींमध्ये पहिली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:11 PM2022-01-07T23:11:36+5:302022-01-07T23:13:18+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव हि देशात १४ वी आली आहे.

Central Armed Forces examinations Mira Road girl bhavna yadav 14th in country and first among girls | केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मीरारोडची भावना यादव देशात १४ वी, तर मुलींमध्ये पहिली 

केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मीरारोडची भावना यादव देशात १४ वी, तर मुलींमध्ये पहिली 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव हि देशात १४ वी आली आहे. मुलीं मध्ये ती देशात पहिली आली आहे. भावना हि मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची कन्या आहे. 

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४ जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील एकूण १८७ उत्तीर्ण विध्यार्थ्यांच्या यादीत मीरारोडच्या शांती विद्या नगरी समोर न्यू ओम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी २८ वर्षीय भावना सुभाष यादव हिने १४ वा क्रमांक पटकावला आहे. सदर परीक्षेत मुलीं मध्ये देशातून पहिली आली असून महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. 

भावना हिचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाल्या नंतर यादव कुटुंबीय मीरारोड मध्ये स्थायिक झाले. त्यामुळे तिने १० वी मीरारोडच्या शांतिपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण तिने विरारच्या विवा महाविद्यालयातून एमएस्सी पर्यंत केले. भावना हिचे वडील सुभाष हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार असून सध्या ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत . यादव हे मूळचे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीचे. भावनाला सुरवाती पासूनच केंद्रीय सेवेत जायची इच्छा असल्याने २०१५ साला पासून ती यूपीएससीची परीक्षा देत होती . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण झाली होती . परंतु मैदानी परीक्षेत तिला अपयश आले . युपीएससीच्या परीक्षेत देखील शारीरिक चाचणीत ती अपयशी ठरत होती. 

गेल्यावेळी देखील भावना हि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती . परंतु लांब उडी मध्ये ती कमी पडली. परंतु अपयशी होऊन देखील तिने जिद्द व चिकाटी सोडली नाही . तिने तिचे प्रयत्न सुरुच ठेवले . घरातून वडील सुभाष व आई निर्मला आणि भाऊ निरंजन यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले . तेलंगणा मधील रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी भावना हिला सातत्याने मार्गदर्शन व मोलाचे सल्ले दिले. 

लॉक डाऊन काळात सरावासाठी मैदान नसल्याने यादव कुटुंबियां समोर मोठा प्रश्न निर्माण झाला . परंतु स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी एका विकासकाला विनंती करून त्याची मोकळी जागा सरावा साठी उपलब्ध करून दिली . त्या जागेतच भावना हिने १०० व ८०० मीटर धावणे , उंच उडी आदींचा नेटाने सराव केला. 

भावना हिची मैदानी आणि शारीरिक चाचणी तळेगावच्या सशस्त्र दलाच्या कॅम्प मध्ये १९ एप्रिल २०२१ रोजी झाली . दोन्ही चाचणीत ती उत्तीर्ण झाल्या नंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी दिल्ली येथील मुख्यालयात तिची मुलाखत झाली होती. आता लवकरच ती हैद्राबाद येथे वर्षभराच्या प्रशिक्षणा साठी जाणार आहे .

Web Title: Central Armed Forces examinations Mira Road girl bhavna yadav 14th in country and first among girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.