केंद्राकडून महाराष्ट्राला ५२०़८४ कोटींची मदत
By admin | Published: January 15, 2015 05:07 AM2015-01-15T05:07:10+5:302015-01-15T05:07:10+5:30
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़
नारायण जाधव , ठाणे
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़ तसेच राज्य सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेल्या २३ हजार ८११ गावांत जमीन महसुलात सूट दिली आहे. शिवाय वीज बिलात ३३़५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णत: माफ आणि टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पंपाची वीजजोडणी न तोडणे बाबत राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाचा शासनादेश आज काढण्यात आला.
राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत राज्याला १ हजार १३ कोटी ४९ लाख रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत़ त्यापैकी पहिल्या हप्त्याचे ५०६ कोटी ७५ लाख यापूर्वीच वितरीत केले आहेत. त्यातून ४१५ कोटी राज्य सरकारने विभागीय स्तरावर वितरीत केले आहेत़ आता दुसऱ्या हप्त्याचे ४२२ कोटी ८४ लाख तसेच वैरण विकास कार्यक्रमाचे ६ कोटी २५ लाख रुपये केंद्र सरकारने २२ डिसेंबर २०१४ रोजी राज्याला दिले आहेत. अशा प्रकारे केंद्राकडून राज्याला ९३५ कोटी ८४ लाख रुपये मिळाले आहेत़ यातूनच दुसऱ्या हप्त्याचे ५२० कोटी ८४ लाख रुपये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांकडे वितरीत करून शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे़