‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

By अविनाश कोळी | Updated: February 11, 2025 16:46 IST2025-02-11T16:45:56+5:302025-02-11T16:46:35+5:30

अर्ज करतानाच केंद्राचा दाखला देण्याची अट

Central Caste Certificate is required for Other Backward Classes, Scheduled Castes, Scheduled Tribes, and Economically Backward Classes students for NEET exam | ‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

अविनाश कोळी

सांगली : यंदाच्या नीट परीक्षेसाठी अर्ज करताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना केंद्रीय जातीचा दाखला आवश्यक केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे हा दाखला नसेल त्यांना संबंधित विभागाकडे अर्ज करून त्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करायची आहे. मात्र, केंद्रीय दाखल्याची मुदत एक वर्षाची असल्याने सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय कोट्यातून प्रवेशावेळी पुन्हा केंद्रीय दाखला काढावा लागणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळले आहेत.

नीटसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मार्चपर्यंत अर्जाची मुदत आहे. या काळात काढलेल्या केंद्रीय जातीच्या दाखल्याची मुदत ३१ मार्च २०२५पर्यंतच असेल. मात्र, केंद्रीय कोट्यातून वैद्यकीय प्रवेश घेताना १ एप्रिल २०२५ नंतरचाच दाखला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे नीटच्या अर्जासाठी यावर्षी काढलेल्या केंद्रीय दाखल्याचा उपयोग ऑल इंडिया कोटासाठीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी होणार नाही. प्रवेश अर्जासोबत केंद्रीय दाखला आवश्यक करण्याचे एनटीएचे प्रयोजन काय? असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित होत आहे.

यापूर्वीची पद्धत काय होती?

अर्ज करताना दाखला नसेल तर वैद्यकीय प्रवेश घेताना सदर दाखला हजर करू, असे प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची संधी गतवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती. यंदाही तशी संधी देण्याची आवश्यकता होती.

एजन्सीकडून पूर्वसूचना नाही

आधारकार्ड अपडेट करण्याविषयी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्व नोटीस काढली होती. मात्र, केंद्रीय दाखल्यासंबंधी कोणतीही पूर्वसूचना एजन्सीने दिलेली नाही. असे असताना ऐनवेळेस हा दाखला आवश्यक केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सध्या देशभरात बारावीची परीक्षा सुरू असल्याने केंद्रीय जातीचा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. या दाखल्याचा उपयोग परीक्षेपुरता अर्ज करण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नव्याने पुन्हा दाखला काढावा लागेल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केंद्रीय जातीच्या दाखल्याऐवजी सेल्फ डिक्लरेशन फॉर्म अपलोड करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली

Web Title: Central Caste Certificate is required for Other Backward Classes, Scheduled Castes, Scheduled Tribes, and Economically Backward Classes students for NEET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.