केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 14:47 IST2020-11-04T14:46:16+5:302020-11-04T14:47:24+5:30
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान
पुणे : विभागात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. यामध्ये कोविड संशयित, होम क्वारंटाईन, हाॅस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या व 65 वर्षांवरील सर्व मतदारांसाठी पोस्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर मतदानच्या एक-दोन दिवस आगोदर पाॅझिटिव्ह आलेल्या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास खास कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनानंतर राज्यात प्रथमच ही जाहिर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विविध मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. यात मतदान केंद्रातील कर्मचा-यांना पीपीए किट पासून, सॅनिटायजर, हॅन्ड ग्लोज सर्व साहित्य व सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांची संख्या 1200 वरून 500 ते 700 करणे, मतदान केंद्राच्या बाहेर थर्मल गन द्वारे तपासणी करणे, सॅनिटायजर करणे आदी विविध प्रकारची खबरदार घेण्यात येणार आहे.
------
- विभागातील मतदार
पदवीधर मतदार संघ : 5 लाख 25 हजार 856
शिक्षक मतदार संघ : 1 लाख 18 हजार 556