देशाच्या घटनेला संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव- मुझफ्फर हुसैन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:34 PM2022-07-25T19:34:23+5:302022-07-25T19:34:48+5:30
बहुमताच्या जोरावर देशात हुकूमशाही चालू असून विविध राज्यातील भाजप विरोधी सरकारे व त्या पक्षाची विचारधारा संपविण्यासाठी ईडी,इन्कम टॅक्स, सीबीआय आदी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून सुडाचे राजकारण
मीरारोड - बहुमताच्या जोरावर देशात हुकूमशाही चालू असून विविध राज्यातील भाजप विरोधी सरकारे व त्या पक्षाची विचारधारा संपविण्यासाठी ईडी,इन्कम टॅक्स, सीबीआय आदी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून सुडाचे राजकारण चालवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी केला.
रविवारी मीरारोडच्या अस्मिता क्लब मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुझफ्फर म्हणाले कि , लोकशाही मार्गाने स्थापन झालेली विरोधी पक्षांची राज्ये उलथवून टाकण्यासाठी कोणत्याही थराला केंद्र सरकार जात असून ते लोकशाहीला घातक आहे. हुकूमशहा नेते जास्त काळ टिकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे. निवडणूक हे एक प्रकारचे युद्ध असून ते लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आगामी निवडणूकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात लहान लहान सभा घेत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचत सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल करावी असे आवाहन प्रदेश सचिव व सह प्रभारी आनंद सिंह यांनी केले. यावेळी प्रदेश सचिव सुरेश दळवी, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, एस.ए. खान, अश्रफ शेख, मर्लिन डिसा, गीता परदेशी, रुबिना फिरोज, महिला अध्यक्ष रूपा पिंटो, प्रवक्ते प्रकाश नागणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे, कुणाल काटकर, दीप काकडे, दीपक बागडी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.