'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:04 AM2024-04-27T11:04:26+5:302024-04-27T11:05:44+5:30
Sanjay Raut: गुजरातमधून २ हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Gujarat Onion Export : निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा कवडीमोल दराने विकला जात असताना केंद्र सरकारने गुजरातला झुकतं माप दिलं आहे. मराष्ट्रात कांद्याची निर्यातबंदी कायम असताना केंद्राने गुजरातमधील दोन हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. निर्यातबंदीच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाला असून महाविकास आघाडीने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे अशी मोदींची भूमिका आहे अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यात कांदा निर्यातबंदी असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ऐन गुजरातमधून २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी दिली आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या न्हावा-शेवा म्हणजेच जेएनपीए बंदरातून गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्यणावरुन खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
"अमूल डेरीने आमची जनावरं जगवण्यासाठी इथे चारा पाठवला म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवर गुन्हे दाखल करुन खटले चालवले. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष. मराष्ट्राचा शेतकरी, गुरं, जनावरं तडफडून मेली पाहिजेच असं मोदी शाहांना वाटत आहे. गुजरातची कांदा निर्यातबंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडचा शेतकरी तडफडत मेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पचनी पडत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. "कोण शेतकऱ्याचा मुलगा? महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच हेलिकॉप्टर द्या असं माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे," असेही संजय राऊत म्हणाले.