अवकाळी संकटात केंद्र सरकारचे हात वर!
By Admin | Published: March 4, 2015 02:49 AM2015-03-04T02:49:32+5:302015-03-04T02:49:32+5:30
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. गारपिटीच्या संकटावेळी राज्य सरकारने मागितलेली मदत केंद्र सरकारने अजून दिलेली नाही. आता नव्या संकटाकरिता केंद्रापुढे झोळी पसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
विशिष्ट कालावधीत ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर केंद्र सरकारकडे मदत मागता येते. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असले तरी पावसाचे प्रमाण केंद्र सरकारच्या निकषानुसार नव्हते. त्यामुळे या संकटाकरिता केंद्राची मदत मिळणे कठीण आहे. मागील मदत अजून मिळालेली नसताना पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. राज्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसात ७ लाख ४९ हजार हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीत तीनजण मरण पावले असून १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. १०५ जनावरे मरण पावली तर १९४ घरांची पडझड झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. राज्यात यापूर्वी दुष्काळामुळे खरीपाचे पिक गेलेली आणि त्यानंतर गारपिट झाल्याने पिकांचे नुकसान झालेली गावे वगळता अन्य गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे खडसे म्हणाले. ज्या गावांमधील पिके दुष्काळामुळे गेली तेथे आणि गारपिटीमुळे ज्यांची खरीपाची पिके गेली तेथे रब्बीची पिके घेतली जाण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)