Aaditya Thackeray: उद्धव ठाकरेंना धक्का! आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर; ५०० कोटींच्या भूखंडाची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 09:55 AM2022-08-17T09:55:29+5:302022-08-17T09:56:33+5:30
Maharashtra Political Crisis: पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे आले आहेत. ५०० कोटींच्या एका भूखंडासंदर्भात चौकशीचे आदेत केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नवी मुंबईमध्ये एका देवस्थानाला देण्यात आलेल्या दहा एकर भूखंडाची चौकशी केली जाणार आहे. दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर भूखंड आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी देण्यात आला असून याच निर्णयाची आता चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या दहा एकर भूखंडाची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाचा आदित्य ठाकरेंना हा धक्का
केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पर्यावरण विभागाने आदित्य ठाकरेंना हा धक्का दिला आहे. तिरुपती बालाजी संस्थानाला महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत दिलेल्या भूखंडाची चौकशी होणार आहे. पर्यावरण विभागाकडून या दहा एकर भूखंडाच्या हस्तांतरणासंदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीआरझेड वन प्रकारातील हा भूखंड देवस्थानाला देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर ही चौकशी केली जाणार आहे.
मिलिंद नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका
मार्च २०२२ मध्ये सिडकोने उलवे सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक तीनच्या वाढीव एक चटई निर्देशांकाने ४० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड केवळ एक रुपया नाममात्र दराने तिरुपती देवस्थानाला देण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका बजावली. नार्वेकर हे तिरुपती बालाजी देवस्थानाच्या समितीवर विश्वस्त आहेत. हा भूखंड देवस्थानच्या ताब्यात देण्यासंदर्भातील पत्र आदित्य ठाकरेंनीच ३० मार्च रोजी ट्विटरवरुन शेअर केले होते. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे.
दरम्यान, देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवस्थानाच्या वतीने हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळूरु, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र, हृषीकेश या शहरात प्रति तिरुपती बालाजी मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. या देवस्थानाला मुंबईत प्रति व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र मुंबईत मोठी सरकारी भूखंड उपलब्ध नसल्याने महामुंबईत पर्यायी भूखंडाचा शोध घेण्यात आला.