मध्य महाराष्ट्रात ३० टक्के पाऊस कमी
By admin | Published: July 2, 2016 03:33 PM2016-07-02T15:33:57+5:302016-07-02T15:33:57+5:30
उशिरा झालेल्या मान्सूनचे आगमन आणि त्यात जोर नसल्याने कोकण वगळता राज्यातील अनेक भागात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 02 - उशिरा झालेल्या मान्सूनचे आगमन आणि त्यात जोर नसल्याने कोकण वगळता राज्यातील अनेक भागात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनच्या पश्चिम शाखेची धीमी वाटचाल आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्याने जूनमध्ये कोकण वगळता मान्सूनचे वारे घाटमाथा ओलांडून पुढे आलेच नाही. त्यांच्यात अधिक तीव्रता नव्हती, त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रात जूनमध्ये संततधार पाऊस झाला नसल्याचे दिसून आले आहे.
१ ते ३० जून दरम्यान मध्य महाराष्ट्रात सरासरी १४५.६ मिमी पावसाची नोंद होते. यंदा मात्र १०२.५ मिमी पाऊस झाला आहे़ यामुळे पावसाळा सुरु झाला असला तरी पुणे विभागात अनेक शहर व गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अद्याप कायम आहे. भीमा आणि कृष्णा खोºयातील जवळपास सर्व धरणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. गेल्या काही दिवसात कोकण आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. जूनच्या अखेरच्या सप्ताहात सुरु झालेल्या या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जूनमधील सरासरी पावसाने ओलांडली आहे. जूनमध्ये कोकणात सरासरी ७०० मिमी पाऊस पडतो, यंदा ७९६ मिमी पावसाची नोंद झाली असून ती १४ टक्के अधिक आहे.
मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. पण, प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जूनच्या सुरुवातीला आणि शेवटी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्याने जूनची सरासरी ओलांडली़ मराठवाड्यात जूनमध्ये सरासरी १४३.३ मिमी पाऊस पडतो़ यंदा तो १५७.१ मिमी झाला आहे.
मान्सूनच्या पूर्वोत्तर शाखेची वेगवान वाटचाल झाल्याने यंदा मान्सूनचे आगमन कोकणाऐवजी विदर्भात प्रथम झाले. त्यामुळे सुरुवातीला विदर्भात सर्वदूर पाऊस झाला असून जूनच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पूर आले असले तरी सरासरीपेक्षा ३ टक्के पाऊस कमी झाला आहे. विदर्भात जूनमध्ये सरासरी १८६.० मिमी पाऊस पडतो़ यंदा १६३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असला तरी मध्य महाराष्ट्रात अजून मोठ्या प्रमाणावर पावसाची आवश्यकता आहे.
देशातील १२ विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस
देशाभरातील ३६ हवामान विभागापैकी गुजरात, सौराष्ट्रमध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १०
विभागात २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे़ तर, १८ विभागात सरासरीपेक्षा १९ टक्के जादा किंवा कमी पाऊस झाला आहे. केवळ ६ विभागात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून त्यात तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकचा समावेश आहे.
गुजरात सौराष्ट्रात सर्वात कमी पाऊस
नैऋत्य मोसमी पाऊसाच्या पश्चिम शाखेची वाटचाल अतिशय धीमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका गुजरात, सौराष्ट्राला बसला आहे़ जून अखेर गुजरातमध्ये सरासरीपेक्षा ७६ टक्के तर, सौराष्ट्रमध्ये ६५ टक्के कमी पाऊस पडला आहे.