राज्यातील हिंसाचारामागं मोठी शक्ती; भाजपा-मनसे युतीबाबतही रावसाहेब दानवेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:23 PM2021-11-13T20:23:43+5:302021-11-13T20:24:36+5:30
विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.
नाशिक – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. अमरावती, नांदेड मालेगाव येथे हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र राज्यातील या वातावरणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्यातील हिंसाचारामागं एखादी मोठी शक्ती आहे असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी केला आहे.
नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रावसाहेब दानवेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण हटवलं जात आहे. त्रिपुरात मस्जिद पाडली असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले? यामागे एखादी शक्ती आहे. संजय राऊतांचा आढावा घ्यायचा असेल तर वेगळी प्रेस घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज आहे. २०२४ मध्ये भाजपा स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच भाजपामनसे युतीबाबत दानवेंनी सूचक विधान केले आहे. मनसे जो पर्यंत परप्रांतीय मुद्द्याबाबत बदल करत नाही तो पर्यंत मनसे भाजप युती शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात गेले. शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने दोन वेळेस पंचनामे केले पण मदत मिळाली नाही. दुष्काळ जाहीर केलाच नाही. विमा देखील शेतकऱ्याला मिळाला नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. मेडिकलच्या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्या. दिलेल्या तारखेला शाळा सुरु झाल्या नाहीत. मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियांच्या धंद्यात आहेत आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.