मध्य रेल्वेची ‘घसरण’ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 05:11 AM2016-12-30T05:11:24+5:302016-12-30T05:11:24+5:30
कुर्ला-अंबरनाथ लोकलचे शेवटचे पाच डबे विठ्ठलवाडी स्थानकात गुरुवारी पहाटे रुळावरून घसरल्याने कल्याण-कर्जत रेल्वेमार्ग तब्बल ११ तास ठप्प झाला. या दुर्घटनेमुळे कर्जतहून
डोंबिवली : कुर्ला-अंबरनाथ लोकलचे शेवटचे पाच डबे विठ्ठलवाडी स्थानकात गुरुवारी पहाटे रुळावरून घसरल्याने कल्याण-कर्जत रेल्वेमार्ग तब्बल ११ तास ठप्प झाला. या दुर्घटनेमुळे कर्जतहून मुंबईला जाणारी वाहतूकही साडेतीन तास विस्कळीत झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मध्य रेल्वेच्या लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सपशेल कोलमडले. त्याचा फटका लाखो चाकरमान्यांबरोबरच पुण्याच्या दिशेने ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना फटका बसला.
पहाटे ५.५३ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. गाडीत फारसे प्रवासी नसल्याने आणि वेगही कमी असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र लोकलचे पाच डबे घसरल्यावर फरफटत पुढे गेल्याने रूळांचे मोठे नुकसान झाले. ओव्हरहेड वायर तुटली व शेजारचे दोन खांबही तुटले. त्यामुळे वीजपुरवठा बंद करण्यात आला. आधी रूळांवरून डबे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर रूळांची दुरूस्ती, ओव्हरहेड वायर जोडण्यासह विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात आली. घसरलेले डबे रूळांवर ठेवून ते अंबरनाथला नेण्यात आले. त्यानंतर मार्ग मोकळा करून दुरूस्ती करण्यात आली. संध्याकाळी ४.३५ ला कल्याणहून कर्जतसाठी गाडी सोडण्यात आली. ती हळूहळू ४.५२ वाजता विठ्ठलवाडी ओलांडून पुढे गेल्याने मार्ग खुला झाला. काही काळ या मार्गावरून धीम्या गतीने वाहतूक होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कल्याण ते कर्जत मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या वेळापत्रकाला फटका बसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती : रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे विठ्ठलवाडी स्थानकानजीक लोकल रुळावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती १५ दिवसांत अहवाल देईल, असे रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगितले.
मोठा फौजफाटा : या घटनेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोहमार्ग पोलिसांचे ४० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले. तेवढ्याच प्रमाणात आरपीएफ, स्थानिक पोलीसही कार्यरत होते.
शटल सेवेचा आधार : रेल्वेने सकाळपासूनच अंबरनाथ-कर्जत मार्गावर शटल सेवा सुरू केली. त्याचा फायदा तेथील महाविद्यालयीन विद्यार्थी, खोपोली, कर्जत येथे जाणाऱ्या प्रवाशांना झाला. सकाळी ८ वाजल्यापासून तासाभराच्या अंतराने येथून लोकल धावल्या.
खासदारांनी केली पाहणी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी दुपारी १२ च्या सुमारास भेट दिली. त्यांनी महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली. लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत करा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच ठाण्याच्या पुढील भागात कर्जतपर्यंत रेल्वेला समांतर मार्ग नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
रस्ते मार्गावर कोंडी
लोकल घसरल्याच्या घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईहून सुटणाऱ्या ११ तर मुंबईकडे जाणाऱ्या सात गाड्या कर्जत-पनवेल-दिवा-ठाणे मार्गाने नेण्यात आल्या.
या गाड्यांना दिवा व ठाण्यात थांबा देण्यात आला. त्यामुळे कल्याण अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र कर्जतसह वांगणी, शेलू, बदलापूर, अंबरनाथ आदी स्थानकात शेकडो प्रवासी अडकले.
- उल्हासनगर व विठ्ठलवाडीच्या प्रवाशांनी रस्तामार्गे कल्याण स्थानक गाठत प्रवास केला. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांची कोंडी झाली.
अधिकाऱ्यांची धाव
- विठ्ठलवाडीच्या अपघाताची माहिती मिळताच तातडीने व्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल आदींनी घटनास्थळी पाहणी केली. त्याआधी ओव्हर हेड वायर, रेल्वे रुळ दुरुस्ती पथकातील कर्मचारी-अधिकारी आदींनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले.
घटनेनंतर या मार्गावरील विद्युत प्रवाह खंडित केला होता. घसरलेले डबे दुपारी १२.१५ च्या सुमारास ट्रॅकवर ठेवण्यात यश आले. त्यानंतर घसरलेली लोकल दुपारी २ नंतर अंबरनाथ स्थानकात नेण्यात आल्याची माहिती स्थानक प्रबंधकांनी दिली.
मोठे नुकसान
डाउन ट्रॅकवरील रुळ, ओव्हरहेड वायर, दोन मोठे विद्युत खांब आणि रुळातील स्लीपर्सचे १५० ते २०० मीटरपर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील स्लीपर्स नव्या टाकणे, खांब नवे टाकणे, ओव्हरहेड वायर बदलणे, सिग्नल यंत्रणेचे काम अशी तांत्रिक कामे सकाळी ७ पासून सुरू होती.
जादा बस
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेने (केडीएमटी) पहाटेपासूनच कल्याणहून बदलापूर आणि अंबरनाथसाठी बस सोडल्या. सुरुवातीला पाच, तर नंतर १४ बस सोडल्याने त्याचा फायदा पाच हजारांहून अधिक प्रवाशांना झाल्याची माहिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.