मध्य रेल्वेचा ‘खोळंबा’संपणार
By admin | Published: October 21, 2016 01:49 AM2016-10-21T01:49:51+5:302016-10-21T01:49:51+5:30
मुंबई उपनगरीय मार्गावरील वाढत्या प्रवासी अपघातांची दखल घेत मध्य रेल्वेतर्फे २0 हजार कोटी रुपये खर्चुन मेकओव्हर केला जाणार आहे. नविन मार्ग, पार्किंग आणि १५0 नव्या लोकल
मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील वाढत्या प्रवासी अपघातांची दखल घेत मध्य रेल्वेतर्फे २0 हजार कोटी रुपये खर्चुन मेकओव्हर केला जाणार आहे. नविन मार्ग, पार्किंग आणि १५0 नव्या लोकल उपलब्ध करुन देण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेवरुन लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने ‘रिपोर्ट आॅन रिव्ह्यू आॅफ रायझिंग ट्रेण्ड आॅफ अॅक्सिडेण्टल डेथ इन मुंबई सबर्बन सिस्टिम’ हा अहवाल मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर अपलोड केला . यानुसार नवे मार्ग टाकतानाच १५0 नव्या लोकल उपलब्ध करण्याची सूचना आहे. मात्र तत्पूर्वी लोकल उभ्या करण्यासाठी सायडिंगची जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागा मिळत नसल्याने मध्य रेल्वेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सीएसटीवर धीम्या मार्गांना भूमिगत करण्याचा आणि सहा लाईन्सच्या समूहामध्ये अप व डाऊन लाईन्सचा एक लूप तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच पनवेल स्थानकाकरीता समितीने कर्जत आणि रोहापर्यंत सेवा वाढविण्याची सूचना मांडली. सीएसटी, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा स्थानकांमध्ये या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली तर धीम्या मार्गावर २0 टक्के लोकल धावू शकतील, असे समितीचे म्हणणे आहे. ट्रान्स हार्बर लाईनवरील रहदारी सीएसटी-कल्याण मार्गापेक्षा कितीतरी वेगाने वाढत असून ४३७ किमी मुंबई उपनगरीय नेटवर्कला दोन मिनिट हेडवे असणाऱ्या मेट्रोसारख्या सेवेमध्ये बदलण्याची योजनाही समोर आली. मध्य रेल्वेला एसी लोकल आणि स्वयंचलित दरवाजाची गरज असल्याचे निष्पन्न झाले. या समितीमध्ये राजन विचारे, पूनम महाजन आणि अरविंद सावंत या खासदारांसह मध्य रेल्वे तत्कालिन महाव्यवस्थापक एस.के.सूद, पालिका आयुक्त अजय मेहता, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त ई-रविंद्रन यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
समितीचा अहवाल
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेवरुन लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची समिती स्थापन
- या समितीने ‘रिपोर्ट आॅन रिव्ह्यू आॅफ रायझिंग ट्रेण्ड आॅफ अॅक्सिडेण्टल डेथ इन मुंबई सबर्बन सिस्टिम’ हा अहवाल बनविला .